बीड : चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरणाच्या गंभीर गुन्ह्यातील अल्पवयीन पीडित मुलीची सुखरूप सुटका करण्यात बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्र

बीड : चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरणाच्या गंभीर गुन्ह्यातील अल्पवयीन पीडित मुलीची सुखरूप सुटका करण्यात बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (एएचटीय) उल्लेखनीय यश मिळवले आहे. या कारवाईदरम्यान एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कारेगाव येथे ही मोहीम पार पडली.
सदर प्रकरणात चकलांबा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 363 अंतर्गत गुन्हा क्रमांक 161/2024 नोंदवण्यात आला होता. अल्पवयीन मुलीच्या अपहरणामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला. तपासाची सूत्रे पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी हाती घेतली. त्यांनी प्रकरणातील कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून तपासाला वेग दिला. सुरुवातीला बीड, पुणे आणि अहिल्यानगर परिसरात शोधमोहीम राबवूनही पीडित मुलगी आणि आरोपी यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे पथकाने तांत्रिक तपासावर भर दिला.
तांत्रिक विश्लेषणातून लागला ठावठिकाणा
तपासादरम्यान अनेक संशयित मोबाईल क्रमांकांची छाननी करून त्यांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. कॉल डिटेल्स आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे पीडित मुलगी व आरोपी नेवासा तालुक्यातील कारेगाव येथे वास्तव्यास असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. या माहितीमुळे तपासाला निर्णायक वळण मिळाले.
नेवासा येथे सापळा; आरोपी जेरबंद
मिळालेल्या माहितीच्या आधारे एएचटीयूचे विशेष पथक 5 मे 2026 रोजी नेवासा येथे रवाना झाले. कुकाना पोलीस दूरक्षेत्रातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने परिसरात गुप्त पाळत ठेवण्यात आली. योग्य संधी साधून दुपारी सुमारे दोन वाजता आरोपी राहत असलेल्या ठिकाणी सापळा रचण्यात आला. अचानक कारवाई करत आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईदरम्यान अल्पवयीन पीडित मुलगी सुरक्षित अवस्थेत आढळून आली. पथकाने तत्काळ तिची सुटका करून तिला संरक्षणात घेतले. त्यानंतर पीडित व आरोपी यांना बीड येथे आणून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी चकलांबा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी मोहिम
ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक मीरा रेडेकर, पोलीस हवालदार प्रदीप येवले, अशोक शिंदे, शोभा जाधव, हेमा वाघमारे तसेच पोलीस शिपाई भाऊसाहेब कारले आणि अक्षय जाधव यांनी समन्वय साधत ही कारवाई यशस्वी केली.
तांत्रिक तपासामुळे गुन्हे उकलण्यास गती
या कारवाईमुळे पुन्हा एकदा तांत्रिक तपासाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि पथकाचा समन्वय यामुळे अल्पवयीन मुलीची वेळेत सुटका होऊ शकली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS