पुणे : वाढता वाहतूक खर्च, वेष्टन साहित्याच्या किंमतीतील वाढ आणि दूध खरेदी दरात झालेली वाढ यामुळे राज्यातील दूध उत्पादक आणि प्रक्रिया उद्योगावर आर

पुणे : वाढता वाहतूक खर्च, वेष्टन साहित्याच्या किंमतीतील वाढ आणि दूध खरेदी दरात झालेली वाढ यामुळे राज्यातील दूध उत्पादक आणि प्रक्रिया उद्योगावर आर्थिक ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख सहकारी व खाजगी दूध संघांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गाईच्या आणि म्हशीच्या पिशवीबंद दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ होणार असून दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीत दहा टक्क्यांपर्यंत वाढ केली जाणार आहे. ही दरवाढ ११ ऑगस्टपासून लागू होणार आहे.
नवीन दरानुसार गाईचे दूध प्रतिलिटर ६० रुपयांवरून ६२ रुपये, तर म्हशीचे दूध ७६ रुपयांवरून ७८ रुपये होणार आहे. त्याचबरोबर दही, ताक, तूप, लोणी, पनीर यांसह विविध दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरवाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या मासिक खर्चावर होणार आहे. राज्यातील सहकारी आणि खाजगी दूध प्रक्रिया संस्थांची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कात्रज येथील कार्यालयात झाली. संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत दूध व्यवसायातील वाढत्या खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीला राज्यातील प्रमुख सहकारी आणि खाजगी दूध संघांचे सुमारे २० प्रतिनिधी उपस्थित होते. वाढलेला उत्पादन खर्च, वाहतूक खर्च, वेष्टन साहित्याच्या किंमती आणि दूध खरेदी दर यांचा विचार करून दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण चांगभारे यांचा दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. गेल्या काही काळात इंधनाच्या दरात झालेली वाढ दूध व्यवसायासाठी मोठी अडचण ठरली आहे. डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे दहा रुपयांनी वाढ झाल्याने दूध संकलन केंद्रांपासून प्रक्रिया केंद्रांपर्यंत आणि तिथून विक्री केंद्रांपर्यंत दूध पोहोचविण्याचा खर्च वाढला आहे. याशिवाय साखरेच्या दरात प्रतिकिलो सुमारे १२ रुपयांची वाढ झाली आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या वेष्टन साहित्याच्या खर्चातही ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यातच दूध उत्पादकांकडून दूध खरेदी करण्याचा खर्च वाढल्याने दूध व्यवसायाच्या एकूण खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे.
वाढत्या उत्पादन आणि वितरण खर्चाचा ताळमेळ साधतानाच दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी विक्री दरात वाढ करणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. दूध संकलन, प्रक्रिया, वेष्टन, वाहतूक आणि वितरण या सर्व टप्प्यांवरील खर्च वाढल्याने दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे दूध संघांकडून सांगण्यात आले. ११ ऑगस्टपासून लागू होणाऱ्या या नव्या दरामुळे दूध उत्पादकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा असली, तरी दुसरीकडे ग्राहकांच्या घरगुती खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढलेल्या किंमतीचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन अर्थसंकल्पावर होण्याची शक्यता आहे.

COMMENTS