मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील एकात्मिक घटक मुंबईमध्ये तब्बल २०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे वृत्त 'दैनिक लोकमंथन'ने २१ जानेवारी २०२६ रोजी

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील एकात्मिक घटक मुंबईमध्ये तब्बल २०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे वृत्त ‘दैनिक लोकमंथन’ने २१ जानेवारी २०२६ रोजी प्रकाशित केले होते. या वृत्तानुसार कार्यकारी अभियंता भूषण फेगडे, उप अभियंता शिंगाडे, शाखा अभियंता विजय पाटील, संतोष पाटील यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याची तक्रार मानवलोक संघटनेने केली होती, त्या आधारे ‘दैनिक लोकमंथन’ने वृत्त प्रकाशित केले होते. मात्र या वृत्ताची दखल घेऊन कार्यकारी अभियंता भूषण फेगडे यांनी असा कोणताही घोटाळा झाला नसल्याचा खुलासा ‘दैनिक लोकमंथन’कडे केला आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभागातील एकात्मिक घटक मुंबईमध्ये २०० कोटींच्या भ्रष्टाचारासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत कार्यकारी अभियंता भूषण फेगडे यांनी शासन परिपत्रक क्रमांक -मुसका-२०१६/१९२५१२/का.१ या परिपत्रकानुसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांचा संबंधित अधिकाऱ्यांनी २४ तासांच्या आत खुलासा करणे अपेक्षित असते. त्याची दखल घेऊन फेगडे यांनी हा खुलासा केला आहे.
फेगडे यांनी केलेल्या खुलाशामध्ये म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागात २०० कोटींचा घोटाळा माझ्या कारकिर्दीमध्ये झालेला नाही. तसेच यासंदर्भात कोणीतरी खोडसाळपणा करत ही तक्रार दाखल केली होती. वास्तविक पाहता २०० कोटींचा कोणताही घोटाळा घडलेला नसून, आम्ही नियमबाह्य कामांना प्राधान्य देत नाही. पारदर्शक आणि नियमानुसार कामाला प्राधान्य देत असल्यामुळे विभागातीलच काहींनी यासंदर्भातील माहिती ‘दैनिक लोकमंथन’ला पुरवली असावी. मात्र ती माहिती चुकीची आणि खोडसाळ आहे. यासंदर्भात असा कोणताही घोटाळा माझ्या कारकिर्दीत झालेला नाही. त्यासंदर्भात आम्ही आमची बाजू खुलाशद्वारे ‘दैनिक लोकमंथन’कडे सादर करत असल्याचे फेगडे यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे.

COMMENTS