Homeताज्या बातम्या

सिद्धिविनायक मंदिरातील देणगी व्यवहारांची चौकशी

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील देणगी संकलन आणि आर्थिक व्यवहारांबाबत करण्यात आलेल्या आरोपांची आता शासनस्तरावरून सखोल चौकशी

शेतीचा खर्च तप्पिट झाला; पीक कर्जाची मर्यादाही वाढवा शेतकरीपुत्र खा.बजरंग सोनवणे यांनी लोकसभेत सरकारला धरले धारेवर
दादा पाटील महाविद्यालयात ‘वाचन संकल्प रयतेचा’ उपक्रमाचा उत्साहात प्रारंभ; मोबाईलचा अतिरेक टाळत पुस्तकांकडे वळण्याचा संदेश
छत्रपती संभाजीनगरमध्ये २३ नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस; तिसऱ्या अपत्यासह अतिक्रमणाचा मुद्दा एरणीवर, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुनावणी
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे  मुख्यमंत्र्यांचे आदेश | आकाशवाणी न्यूज

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील देणगी संकलन आणि आर्थिक व्यवहारांबाबत करण्यात आलेल्या आरोपांची आता शासनस्तरावरून सखोल चौकशी केली जाणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिराच्या देणगीपेटीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मंदिर न्यासाच्या पदाधिकाऱ्यांनीही या प्रकरणाबाबत शासनाकडे तक्रार केली. या सर्व घडामोडींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सिद्धिविनायक मंदिरातील मागील पाच वर्षांतील देणगी संकलन, त्याची नोंद आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जाणार आहे. विशेषतः २०२३ ते २०२६ या कालावधीत देणगीच्या रक्कमेत झालेल्या चढ-उतारांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. देणगीपेटीतील रक्कम, विविध माध्यमातून प्राप्त झालेल्या देणग्या, त्यांची नोंद तसेच संबंधित आर्थिक कागदपत्रांची पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. मंदिराच्या देणगीपेटीतून दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. राज ठाकरे यांच्या आरोपानंतर मंदिर प्रशासनाकडून हे आरोप फेटाळण्यात आले होते. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनीच चौकशीचे आदेश दिल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. चौकशीच्या निष्कर्षातून आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर आणि कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती दिली.

सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील भाविकांचे श्रद्धास्थान असून, येथे मोठ्या प्रमाणावर देणगी जमा होते. त्यामुळे मंदिराच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता असणे महत्त्वाचे मानले जाते. आता शासनाकडून होणाऱ्या चौकशीत नेमके कोणते आर्थिक व्यवहार समोर येतात आणि राज ठाकरे यांच्या आरोपांबाबत काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चौकशी अहवालानंतर या प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांना पूर्णविराम मिळतो की त्यातून नव्या राजकीय वादाला तोंड फुटते, हेही स्पष्ट होणार आहे.

COMMENTS