मुंबई : शहरी बँकिंग व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. देशातील शहरी बँकिंग क्षेत्र
मुंबई : शहरी बँकिंग व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. देशातील शहरी बँकिंग क्षेत्राचा विस्तार आणि बळकटीकरण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय शहरी सहकार वित्त व विकास महामंडळाची नवी कार्यालयीन वास्तू पुढील शंभर वर्षे आर्थिक व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार ठरेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. मंत्री अमित शाह यांच्या हस्ते मुंबईत राष्ट्रीय शहरी सहकार वित्त व विकास महामंडळाच्या नवनिर्मित कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शहरी बँकिंग क्षेत्रातील बदलांवर भाष्य करताना शाह यांनी या क्षेत्राच्या आधुनिकीकरणाची गरज अधोरेखित केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने बँकिंग सेवा अधिक सुलभ, वेगवान आणि सुरक्षित होण्यास मदत होईल. राष्ट्रीय स्तरावरील ही संस्था शहरी सहकार बँकिंग व्यवस्थेला व्यापक आधार देण्याचे काम करेल, असे त्यांनी सांगितले. देशातील आर्थिक व्यवहारांमध्ये डिजिटल पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल व्यवहारांना चालना मिळाली असून, त्याचबरोबर आर्थिक व्यवहारांची सुरक्षितता आणि सायबर सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले. देशातील सुमारे १,४०० शहरी सहकारी बँकांमध्ये जवळपास सहा लाख कोटी रुपयांच्या ठेवी असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली. या बँका सर्वसामान्य नागरिक, लघुउद्योजक आणि स्थानिक व्यवसायांसाठी महत्त्वाची आर्थिक आधारव्यवस्था असल्याचे त्यांनी नमूद केले. लहान सहकारी बँकांमध्ये कर्जवसुलीचे प्रमाणही समाधानकारक असल्याचे शाह यांनी सांगितले. या बँकिंग व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि प्रभावी आर्थिक व्यवस्थापन यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रानेही या बदलांशी जुळवून घेत सुरक्षित आणि आधुनिक सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन शाह यांनी केले.
फडणवीस-शिंदेंसोबत शाह यांची चर्चा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विविध विषयांवर बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीतील चर्चेचा तपशील मात्र अधिकृतपणे समोर आलेला नाही.

COMMENTS