Homeताज्या बातम्या

८०० बाल वारकर्‍यांचे नयनरम्य रिंगण, सहावीच्या चिमुकल्यांचे अभ्यासपूर्ण कीर्तन; माइलस्टोन स्कूलच्या मैदानावर अवतरली पंढरी!

बीड: टाळ-मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष, डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या शेकडो चिमुकल्या वारकरी मुली आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेतील

मृग नक्षत्र कोरडे; बीड जिल्ह्यात शेतकरी हवालदिल! कापूस, सोयाबीन पिकांवर पावसाअभावी संकट
शेवगावात शिंदे गटाकडून दोन स्वतंत्र शक्तीप्रदर्शन; आमदार विलास भुमरेंच्या दौऱ्यानंतर अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर
शिक्षक संघटना एवढ्या निद्रिस्त कशा? डॉ. नंदकुमार उघाडे यांचा संतप्त सवाल; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंब्याचे आवाहन

बीड: टाळ-मृदुंगाचा गजर, ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष, डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या शेकडो चिमुकल्या वारकरी मुली आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांच्या नयनरम्य रूपाने बीड शहरातील माइलस्टोन इंटरनॅशनल स्कूलचा परिसर अक्षरशः प्रति-पंढरपूर बनून गेला होता. निमित्त होते शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य आषाढी एकादशी सोहळ्याचे. यावेळी शाळेच्या मैदानावर तब्बल ८०० विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभूतपूर्व रिंगण सोहळ्याने उपस्थितांचे लक्ष वेधले, तर सहावीच्या चिमुकल्या कीर्तनकारांनी अत्यंत अभ्यासपूर्ण कीर्तनाची मांडणी केली.

शाळेच्या विस्तीर्ण प्रांगणात पार पडलेला हा सोहळा भारतीय संस्कृती आणि संस्कारांचा अनोखा त्रिवेणी संगम ठरला. पारंपारिक वारकरी पोशाखात, कपाळावर बुक्का लावलेले चिमुकले हातात भगव्या पताका घेऊन अत्यंत शिस्तीत उभे होते. त्यांच्या रांगेत विठ्ठल-रुक्मिणी आणि इतर संतांच्या वेशातील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या चिमुकल्या वारकर्‍यांची वेशभूषा आणि त्यांचा उत्साह पाहून जणू पंढरीची वारीच माइलस्टोनमध्ये अवतरली आहे, असा भास होत होता.

हा भव्य सोहळा माइलस्टोन संस्थेच्या उपाध्यक्षा नम्रता भानुसे, सचिव ज्ञानेश्वर तांबे आणि मुख्याध्यापिका सारिका जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडला. या उपक्रमात तीनही शाखांमधील सर्व शिक्षक, सहशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.

तीन शाळांची संयुक्त ग्रंथदिंडी अन् भव्य रिंगण

या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे माइलस्टोन स्कूलच्या तळेगाव ब्रांच, कालिका नगर ब्रांच आणि डी.पी. रोड ब्रांच या तीनही शाळांमधील ८०० विद्यार्थ्यांनी यात एकत्रित सहभाग नोंदवला. तीनही शाळांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या भव्य ग्रंथदिंडीने सोहळ्याचा उत्साह द्विगुणित केला. शाळेच्या मैदानावर या ८०० विद्यार्थ्यांनी तयार केलेले विशाल गोलाकार रिंगण अत्यंत नेत्रदीपक होते. या रिंगणात विद्यार्थ्यांनी हरि नामाच्या गजरात दिंडी नृत्य सादर केले.

सहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रगल्भ कीर्तन

केवळ रिंगण आणि दिंडीच नाही, तर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले अत्यंत अभ्यासपूर्ण कीर्तन या सोहळ्याचा मुख्य आकर्षणबिंदू ठरले. मराठी शिक्षिका जयश्री राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तेजस नरवडे, मल्हार खटाने, अंश नवसागर, जयेश जाधव, सर्वेश जमदाडे, सिद्धार्थ काळे आणि अक्षद बनकर या विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराजांच्या “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” या अभंगावर अत्यंत सुरेख व प्रगल्भ निरूपण केले. इतक्या लहान वयात विद्यार्थ्यांनी सादर केलेली कीर्तन सेवा पाहून उपस्थित पालक आणि शिक्षक थक्क झाले. शाळेत विद्यार्थ्यांकडून कीर्तन करवून घेण्याचा हा उपक्रम अत्यंत अभिनव आणि कौतुकास्पद ठरला.

COMMENTS