Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माळाकोळी येथे जलजीवन मिशनच्या पाइपसाठ्याला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान, व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह

नांदेड : लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत साठवून ठेवलेल्या प्लास्टिक पाइपांना दुपारी भीषण आग लागून लाखो ते कोट्यवधी रुपयां

शेवगाव नगरपरिषदेच्या अग्निशामक वाहनाचे लोकार्पण
मुंबईत मध्यरात्री थरार! सायन प्रतीक्षा नगर बस डेपोत भीषण आग; दोन बसेस जळून खाक!
कामठीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, दहा जखमी ; घरासह लाखोंचे नुकसान
Nanded Fire: 60 Lakh Loss in Jal Jeevan Mission Pipe Fire | नांदेड:  माळाकोळीत जलजीवन मिशनच्या पाईपांना आग

नांदेड : लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत साठवून ठेवलेल्या प्लास्टिक पाइपांना दुपारी भीषण आग लागून लाखो ते कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुमारे 8 ते 10 किलोमीटरपर्यंत काळा धुराचा प्रचंड लोट आकाशात पसरल्याचे नागरिकांनी पाहिले. घटनेमुळे प्रशासन व कंत्राटदारांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माळाकोळी गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत 32 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेचे कंत्राट गंगाखेड येथील संतोष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच या योजनेचा शुभारंभ सोहळा पार पडला असला तरी प्रत्यक्ष कामाची गती संथ असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात होती. योजनेसाठी लागणारे प्लास्टिक पाइप मोठ्या प्रमाणावर गावाजवळील मोकळ्या जागेत साठवून ठेवण्यात आले होते. मात्र, या पाइप साठ्यालाच दुपारी सुमारे 2.30 वाजता अचानक आग लागली. सुरुवातीला किरकोळ वाटणारी आग काही मिनिटांतच भयानक रूप धारण करत आकाशाला भिडणार्‍या ज्वाळांमध्ये परिवर्तित झाली. ज्वालांचा प्रचंड भडका आणि दाट काळा धूर दूरवरूनही स्पष्टपणे दिसत होता. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, प्लास्टिक साहित्यामुळे आग अधिक वेगाने पसरत असल्याने ती नियंत्रणात आणणे मोठे आव्हान ठरले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. तरीही मोठ्या प्रमाणावर पाइप जळून खाक झाले असून नुकसान कोट्यवधींच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. इतक्या मोठ्या प्रकल्पाचा साहित्यसाठा कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता उघड्यावर ठेवणे म्हणजे निष्काळजीपणाचा कळस आहे, अशी टीका ग्रामस्थांकडून केली जात आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी शॉर्टसर्किट, निष्काळजीपणा किंवा जाणूनबुजून लावलेली आग अशा विविध शक्यता व्यक्त होत आहेत. दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाच्या योजनेत अशा प्रकारची घटना घडणे ही केवळ अपघात नसून व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींचे द्योतक असल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाने या घटनेतून धडा घेत भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणाला आळा घालणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

COMMENTS