पहिल्या यादीतील 32 हजार 34 जणांचे आधार प्रमाणीकरण बाकी बीड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत बीड जिल्ह्यातील

पहिल्या यादीतील 32 हजार 34 जणांचे आधार प्रमाणीकरण बाकी
बीड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा मिळू लागला आहे. जिल्ह्यातील 13 हजार 110 पात्र शेतकर्यांच्या बँक खात्यांवर आतापर्यंत तब्बल 90 कोटी 75 लाख रुपयांचा कर्जमाफीचा निधी थेट जमा करण्यात आला आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम ऑनलाइन पद्धतीने वर्ग करण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पात्र शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी 711 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी पात्र शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत वितरित करण्यात आलेल्या 90.75 कोटी रुपयांपैकी राष्ट्रीयकृत बँकांमधील 9 हजार 283 शेतकर्यांच्या खात्यांवर 70 कोटी 1 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तर बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 3 हजार 827 शेतकर्यांच्या खात्यांवर 20 कोटी 24 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
योजनेच्या पहिल्या टप्प्यात 25 जुलै रोजी 96 हजार 523 पात्र शेतकर्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीतील 32 हजार 34 शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. यादीत नाव असूनही कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा झाली नसल्यास संबंधित शेतकर्यांनी सर्वप्रथम आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे का, याची खात्री करावी. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.
कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकर्यांसाठी आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, चालू खरीप हंगामासाठी त्यांना तातडीने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने सर्व बँकांना दिले आहेत. त्यामुळे कर्जमुक्त झालेल्या शेतकर्यांना नव्या हंगामातील शेतीसाठी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील बँकांनी 2 लाख 27 हजार 128 कर्जखात्यांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केली आहे. पात्र शेतकर्यांना वेळेत लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाकडून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. पहिल्या यादीत नाव असलेल्या आणि अद्याप आधार प्रमाणीकरण न केलेल्या सर्व शेतकर्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे आणि कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सतिश तोटावार यांनी केले आहे.

COMMENTS