Homeकृषी

जिल्ह्यातील ७२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ६९७ कोटी वर्ग; आधार प्रमाणीकरणात अहिल्यानगर राज्यात प्रथम

अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील ७२ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर एकूण ६९७

आकाशवाणी@90 उपक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात  
विद्यार्थ्यांचं भविष्य उज्वल होण्यासाठी शाळेमध्ये रोबोटिक्स लॅबची उभारणी – BD0 सोनल शहा
संतोष पेढेकर यांची भारतीय सैन्यात निवड

अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील ७२ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर एकूण ६९७ कोटी ८१ लाख २५ हजार १३९ रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. कर्जमुक्ती योजनेच्या ऑनलाइन लाभ वितरणास सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात हा लाभ देण्यात आल्याची माहिती जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे कर्जमाफीच्या लाभ वितरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील लाभार्थ्यांमध्ये अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६५ हजार ६५६ शेतकरी सभासदांचा समावेश असून, त्यांच्या कर्जखात्यांवर ६२२ कोटी ७४ लाख रुपयांचा लाभ जमा करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमधील ६ हजार ९०३ शेतकरी सभासदांना ७५ कोटी ७ लाख २५ हजार १३९ रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

पहिल्या यादीतील पात्र शेतकऱ्यांपैकी ज्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच कर्जखात्यावर लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना संबंधित बँकांनी तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे कर्जमाफीच्या लाभानंतर शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक आधार मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्या दिशेने कार्यवाही सुरू झाल्याबद्दल पालकमंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करून आभार मानले.

१ लाख १५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण २ लाख ३३ हजार ७११ शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पहिल्या यादीत १ लाख ३२ हजार ५९१ शेतकरी पात्र ठरले असून, त्यापैकी १ लाख १५ हजार ६९२ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. आधार प्रमाणीकरणाच्या कामात अहिल्यानगर जिल्हा राज्यात प्रथम असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

८ हजार ३६३ शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही जिल्ह्यातील ८ हजार ३६३ शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नसल्याची माहिती देण्यात आली. संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी काढावा. तसेच मयत खातेदारांच्या बाबतीत त्यांच्या वारसांनी विकास सेवा संस्थेकडे किंवा संबंधित बँकेकडे वारस नोंद करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले.

COMMENTS