अहिल्यानगर : काळी जादू करून पैशांचा पाऊस पाडतो, घरावरील करणी दूर करतो तसेच आजार बरे करतो, असे आमिष दाखवून एका तरूणीवर अत्याचार तसेच तिच्या कुटुंब

अहिल्यानगर : काळी जादू करून पैशांचा पाऊस पाडतो, घरावरील करणी दूर करतो तसेच आजार बरे करतो, असे आमिष दाखवून एका तरूणीवर अत्याचार तसेच तिच्या कुटुंबाची आर्थिक फसवणूक करणार्या भोंदूबाबाला येथील जिल्हा न्यायाधीश एम. एस. भदाणे यांनी दोषी धरत 10 वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे (वय 42, रा. शिर्सुफळ, आटोळे वस्ती, ता. बारामती, जि. पुणे) असे शिक्षा झालेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. फिर्यादी पीडिता व तिच्या कुटुंबीयांना ज्ञानदेव कांबळे याने स्वतःला देवऋषी असल्याचे भासवले होते. घरातील आजारपण, मेंढ्यांचा मृत्यू, करणी व जादूटोणा यांपासून मुक्ती मिळवून देतो, असा दावा करून त्याने कुटुंबाचा विश्वास संपादन केला.पीडिता सतत आजारी पडत असल्याने तिला बरे करण्यासाठी लग्नासारखा विधी करावा लागेल, असे कांबळे याने सांगितले. त्यासाठी त्याने आणि पीडितेच्या गळ्यात हार व मंगळसूत्र घालून फोटो काढण्यात आले. हे फोटो पुढे देवीसमोर पूजेसाठी ठेवायचे असल्याचे सांगून त्याने पीडितेची दिशाभूल केली. त्याने स्वतःकडे पैशांचा पाऊस पाडण्याची विद्या असल्याचे सांगत पूजाविधीसाठी पीडितेच्या वडिलांकडून तब्बल पाच लाख 50 हजार रूपये उकळले. या माध्यमातून कांबळे याने आर्थिक शोषण व फसवणूक केल्याचे न्यायालयाने मान्य केले.

COMMENTS