जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेला वेग देत नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर मोठी धड

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेला वेग देत नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर मोठी धडक कारवाई केली. ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ आणि ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 1 कोटी 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांसह अन्य चार अज्ञात आरोपींविरुद्ध विविध कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथक रविवारी गस्त घालत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, इंजेगाव आणि बोंढार शिवारातील गोदावरी नदीपात्रातून काही जण अवैधरीत्या रेतीचा उपसा करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास इंजेगाव परिसरात छापा टाकला. घटनास्थळी रेतीचा साठा, तराफे आणि इंजिनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर रेती उपसा सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 20 तराफे आणि 6 इंजिन जप्त केले. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच बोंढार परिसरातील काही रेती माफियांनी नदीतील बोट क्रेनच्या सहाय्याने आयशर वाहनात टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पोलिसांनी पाठलाग करून संबंधित वाहनांसह आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत 1 बोट, 1 आयशर वाहन (एमएच 26 बीई 7393), एआयएस कंपनीची क्रेन (एमएच 26 बीक्यू 2693), 20 तराफे, 6 इंजिन आणि 5 ब्रास रेती असा एकूण 1 कोटी 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक माधव जाधव, इंद्रजित सोखी, शेख अजीम, पिंटू तिडके यांच्यासह इतर चार अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धाडसी कारवाईबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचे वरिष्ठ अधिकार्यांनी विशेष कौतुक केले आहे.

COMMENTS