ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा व सुगंधित पान मसाला बेकायदेशीररित्या विक्रीसाठी घेऊन जाण

ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा व सुगंधित पान मसाला बेकायदेशीररित्या विक्रीसाठी घेऊन जाणार्या आरोपीला तब्बल 30 लाख 63 हजार 650 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकार्यांना बंदी घातलेल्या गुटखा व सुगंधित पान मसाला विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलीस अधिकारी टापरे चौक परिसरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप ( एम एच -37 -टी 3601)गाडेगाव रोडमार्गे बोंढार बायपासने नांदेड शहरात येणार असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंदी घातलेला गुटखा व सुगंधित पान मसाला वाहतूक केला जात आहे. माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक व्यंकट कुसमे, पोलीस अधिकारी ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस अंमलदार मारोती पचलिंग, शंकर माळगे, धम्मपाल कांबळे आणि त्यांच्या पथकाने कांदा मार्केट चौक येथे सापळा रचला. दरम्यान संशयित बोलेरो पिकअप थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पोलिसांना कट मारून भरधाव वेगाने वाहन पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून वाहन अडविले व चालकाला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने आपले नाव रईस मोहम्मद अमेर मोहम्मद (वय 31), रा. शांतीनगर, जिल्हा आदिलाबाद, तेलंगणा असे सांगितले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला आणि मानवी आरोग्यास घातक असलेला मोठ्या प्रमाणात गुटखा व सुगंधित पान मसाला आढळून आला. पोलीसांनी वाहनासह एकूण 30 लाख 63 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे करीत असून उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS