मांजरसुंबा: गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणार्या पवित्र गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त संस्थान, बालाघाट, कपिलधारवाडी (मांजरसुंबा) येथे ब

मांजरसुंबा: गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणार्या पवित्र गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त संस्थान, बालाघाट, कपिलधारवाडी (मांजरसुंबा) येथे बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प.पू. ष.ब्र. श्री १०८ शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर यांच्या कृपाशीर्वादाने व दत्त उपासक वैजिनाथ महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री दत्त संस्थानमध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवाभिषेक, श्री दत्तमूर्ती अभिषेक, प.पू. महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, पादुका पूजन, महाआरती तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरु हे जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक मानले जातात. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असतात. श्री दत्त संस्थान, बालाघाट येथे होणार्या या उत्सवामुळे परिसरात आध्यात्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
या उत्सवासाठी अन्नदानाची सेवा पांडुरंग बाजीराव शिंदे (कपिलधारवाडी) व अश्रुबा माणिक शिंदे (कपिलधारवाडी) यांच्या वतीने करण्यात आली आहे. पंचक्रोशीतील सर्व दत्त भक्तांनी या पवित्र गुरुपौर्णिमा उत्सवाला आवर्जून उपस्थित राहून श्री दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त संस्थान, बालाघाट व समस्त दत्त भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS