नांदेड : उन्हाळी सुट्टीनंतर येत्या १५ जूनपासून जिल्ह्यातील शाळा पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजणार असून नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागता

नांदेड : उन्हाळी सुट्टीनंतर येत्या १५ जूनपासून जिल्ह्यातील शाळा पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजणार असून नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन नवोदित विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) तथा प्रशासक मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात या प्रवेशोत्सवाचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, महापालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी शाळांना भेटी देऊन सोयी-सुविधांचा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेणार आहेत.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सुमारे ३ लाख १६ हजार मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे १ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत सर्व शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच मेघना कावली यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘विद्यार्थी आरोग्यदूत’ या अभिनव उपक्रमालाही यादिवशी प्रारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये रांगोळ्या, स्वागत कमानी, प्रभातफेरी आणि ढोल-ताशांच्या गजर अशा विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

COMMENTS