Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र सत्तेच्या हव्यासाने भरकटला; नसरापूर घटनेवर राज ठाकरे संतप्त, कठोर कारवाईची मागणी

मुंबई : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या धक्कादायक घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आ

अक्षय तृतीयेच्या दिवशी होणारे; बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज
पर्वतीत नराधम आजोबाचे नातीवर अत्याचार करण्याचे धाडस; शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण!
डी-मार्ट तिहेरी हत्याकांडाचा तपास वेगात; आश्रयदात्यांवरही पोलिसांनी फास आवळला;आणखी 2 आरोपी जेरबंद; मुख्य सूत्रधार साई लाला अद्याप फरार

मुंबई : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या धक्कादायक घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला असून, आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या अमानुष घटनेचा निषेध करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अशा गुन्ह्यांनंतर केवळ आश्‍वासनांवर थांबण्याऐवजी प्रशासनाने ठोस आणि जलद पावले उचलली पाहिजेत. प्रत्येक वेळी घटना घडल्यानंतरच यंत्रणा सक्रिय होते, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यात महिलांवरील अत्याचार, अपहरण आणि शोषणाच्या घटना वाढत चालल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कायद्याचा धाक कमी झाल्यामुळेच अशा प्रकारांना खतपाणी मिळत असल्याची टीका त्यांनी केली. नसरापूर येथे घटनेनंतर नागरिकांनी केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. आंदोलकांवर तत्पर कारवाई होते, मात्र गुन्हेगारांवर तितकीच कडक भूमिका का घेतली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या पार्श्‍वभूमीवर त्यांनी व्यापक सामाजिक चिंतनाची गरज व्यक्त केली. स्त्री शिक्षण आणि सक्षमीकरणात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार घडत असतील, तर त्यामागील कारणांचा सखोल विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. काही दिवस संताप व्यक्त करून नंतर सर्व काही विसरण्याची प्रवृत्ती धोकादायक असल्याचेही त्यांनी सांगितले. समाजातील बदलत्या प्रवृत्तींकडे लक्ष वेधताना त्यांनी सत्तेची लालसा, पैशाचा हव्यास आणि सामाजिक नियंत्रण कमी होणे यामुळे परिस्थिती बिघडत असल्याचे नमूद केले. पूर्वी समाजात परस्परांवर लक्ष ठेवण्याची पद्धत होती, ती आता कमी झाल्याने चुकीच्या प्रवृत्ती वाढीस लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक बदलांमुळे संधी वाढल्या असल्या तरी मूल्यव्यवस्थेवर परिणाम झाल्याचेही त्यांनी नमूद केले. समाज, माध्यमे आणि राजकारणी यांनी जबाबदारीने वागण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत, महाराष्ट्राचे भरकटलेले लक्ष पुन्हा योग्य दिशेने नेण्याची वेळ आल्याचा इशारा त्यांनी दिला.

COMMENTS