मुंबई : राज्यातील सर्व निवडणुका पार पडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात बदलांचे संकेत दिल्याच

मुंबई : राज्यातील सर्व निवडणुका पार पडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात बदलांचे संकेत दिल्याची चर्चा रंगली आहे. येत्या दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त होत असून, यामुळे विद्यमान मंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने नेतृत्व पातळीवर हालचाली सुरू आहेत. गेल्या काही काळातील मंत्र्यांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला जात असून, त्यावर आधारित निर्णय घेतले जाणार आहेत. अपेक्षित कामगिरी न करणार्या किंवा विभागीय स्तरावर प्रभावी ठसा उमटवण्यात अपयशी ठरलेल्या मंत्र्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या मते, कामगिरीत कमी पडलेल्या काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते. मात्र, अशा नेत्यांना पूर्णपणे बाजूला न करता पक्ष संघटनेत नवी जबाबदारी देण्याचा विचार आहे. यामागे संघटन मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय ठेवणे हा उद्देश असल्याचे सांगितले जाते. या फेरबदलात नव्या चेहर्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. सध्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या काहींना मंत्रिमंडळात बढती मिळू शकते, तर आपल्या मतदारसंघात प्रभावी काम करणार्या काही आमदारांना प्रथमच मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल महत्त्वाचा मानला जात आहे. पुढील काळात होणार्या विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलले जाऊ शकते. शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम आणि परिणामकारक नेतृत्वाची गरज अधोरेखित केली जात आहे.
दरम्यान, काही विभागांतील कामकाजाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त होत असल्याची चर्चा आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागातील काही मंत्र्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, वादग्रस्त ठरलेल्या किंवा स्थानिक स्तरावर नाराजी निर्माण करणार्यांनाही वगळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच, संभाव्य फेरबदलामुळे सत्ताधारी आघाडीत नवी समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसत असून, दिवाळीपूर्वी होणारा हा निर्णय राज्याच्या राजकारणाला नवे वळण देणारा ठरू शकतो.

COMMENTS