नांदेड : शहरातील डी-मार्ट परिसरात 4 एप्रिल रोजी घडलेल्या थरारक तिहेरी हत्याकांडाच्या तपासाला आता निर्णायक वळण लागले असून पोलिसांनी कारवाईची व्याप

नांदेड : शहरातील डी-मार्ट परिसरात 4 एप्रिल रोजी घडलेल्या थरारक तिहेरी हत्याकांडाच्या तपासाला आता निर्णायक वळण लागले असून पोलिसांनी कारवाईची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. या प्रकरणात केवळ प्रत्यक्ष हल्लेखोरांनाच नव्हे, तर फरार आरोपींना आश्रय देणार्या व पळून जाण्यास मदत करणार्या व्यक्तींनाही कायद्याच्या कचाट्यात आणण्याचा पोलिसांचा निर्धार दिसून येत आहे.
ताज्या कारवाईत स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शेख शाहरुख उर्फ कबुत्तर आणि शेख उबेद या दोन फरार आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या काळात अधिक चौकशी करून गुन्ह्याचे धागेदोरे उलगडण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे. यापूर्वीच सोनू राऊत व साहेर या आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या वाढली असली तरी मुख्य सूत्रधार साई लाला अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. घटनेचा तपशील पाहता, दोन गटांतील जुना वाद आणि त्यातून निर्माण झालेली वैरभावना ही या हत्याकांडामागची मुख्य कारणे असल्याचे समोर आले आहे. 4 एप्रिलच्या मध्यरात्री प्रफुल्ल उर्फ अरिजितसिंग गजानन चव्हाण याच्यावर साई लाला आणि त्याच्या साथीदारांनी अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्रांनी करण्यात आलेल्या या हल्ल्यात दोन्ही गटांतील प्रत्येकी एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा नंतर शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे हा वाद थेट तिहेरी हत्याकांडात परिवर्तित झाला आणि संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, तपासाच्या धाग्यांमधून एक महत्त्वाची बाब उघडकीस आली आहे. मुख्य आरोपी साई लाला याला फरार होण्यासाठी मदत करण्यात मन्मथ मंगरुळे आणि दिग्विजय नारगुडे यांची भूमिका असल्याचे समोर आले आहे. या दोघांनी आरोपीला लपवणे, पळून जाण्यासाठी साधने उपलब्ध करून देणे किंवा पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी आश्रयदाते आणि मदतनीसांविरुद्धही कठोर कारवाईचा इशारा दिला असून, अशा प्रकारे गुन्हेगारांना मदत करणार्यांना कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. स्थानिक गुन्हा शाखेने या प्रकरणात तांत्रिक तपास, कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास अधिक तीव्र केला आहे. फरार मुख्य आरोपी साई लाला याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून संभाव्य ठिकाणी छापेमारी सुरू आहे.
दरम्यान, या तिहेरी हत्याकांडामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरच अटक करून गुन्ह्याचा संपूर्ण तपास पूर्ण केला जाईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

COMMENTS