बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातून बीड जिल्ह्यासाठी किमान एक जागा राखीव ठेवून शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांना संधी द्यावी, अशी ठाम मागणी शिवसेना जिल्हा संघटक सुनिल सुरवसे यांनी केली आहे.
ही मागणी करताना त्यांनी सांगितले की, अनिलदादा जगताप यांनी 1986 पासून शिवसेनेत सातत्याने कार्य करत पक्षाशी निष्ठा राखली आहे. शाखाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख ते जिल्हाप्रमुख असा त्यांचा संघटनात्मक प्रवास राहिला असून त्यांनी नगरसेवक, जिल्हा परिषद तसेच विधानसभा निवडणुकाही शिवसेनेच्या चिन्हावर लढवल्या आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवसेना हा त्यांचा परिवार राहिला असून चार दशकांहून अधिक काळ पक्षासाठी केलेल्या निष्ठावान कार्याचा विचार करून त्यांना विधान परिषदेची संधी देणे योग्य ठरेल, असे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा उल्लेख करताना सुरवसे यांनी सांगितले की, एकेकाळी जिल्ह्यातील सातपैकी चार मतदारसंघांवर शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र कालांतराने हे वर्चस्व कमी होत गेले आणि सध्या जिल्ह्यात शिवसेनेचा एकही लोकप्रतिनिधी नसल्याने कार्यकर्त्यांना शासकीय कामकाजात अडचणी येत आहेत. पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, रुग्णालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कामांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवत असून मित्रपक्षांकडूनही अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याला सक्षम आणि हक्काचा लोकप्रतिनिधी मिळणे आवश्यक असून अनिलदादा जगताप यांना विधान परिषदेत संधी दिल्यास संघटना अधिक मजबूत होईल आणि शिवसैनिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास सुनिल सुरवसे यांनी व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून बीड जिल्ह्यातील शिवसैनिकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS