नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढत्या जनाधारामुळे काही राजकीय मंडळी अस्वस्थ झाली असून, त्या

नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढत्या जनाधारामुळे काही राजकीय मंडळी अस्वस्थ झाली असून, त्यांचे नेतृत्व खच्चीकरण करण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षनिष्ठा बाजूला ठेवून संधीसाधूपणाचे राजकारण करणार्यांना पक्ष नेतृत्वाने जवळ करू नये, अशी ठाम मागणी कार्यकर्त्यांतून होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात मदतीच्या नावाखाली आमदार कल्याणकर यांच्याकडून वारेमाप आर्थिक लाभ घेणारेच काही चेहरे नंतर त्यांना पराभूत करण्यासाठी सक्रिय झाल्याचा आरोप होत आहे. विविध स्तरांवर शर्तीचे प्रयत्न करूनही जनतेने निवडणूक स्वतःच्या हातात घेत आमदार बालाजी कल्याणकर यांना विजयी केले. त्यामुळे मतदारांनीच विरोधकांना स्पष्ट संदेश दिल्याचे मानले जात आहे. कल्याणकर यांचे वाढते नेतृत्व काहींना सहन होत नसल्याने काही बाजारबुणग्यांना पुढे करून त्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. पैसे घेऊन वैयक्तिक आरोप करणार्यांनी प्रथम स्वतःची निष्ठा पक्षाशी आहे का, याचे आत्मपरीक्षण करावे, असा संतप्त सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे. दरम्यान, आमदार कल्याणकर यांना पराभूत करण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले, याची संपूर्ण माहिती एकनाथ शिंदे यांना असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे योग्य वेळी अनेक मुखवटे गळतील, असा दावा शिवसैनिक करीत आहेत. महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचा प्रचार करणारे, त्यांच्या कार्यालयांचे उद्घाटन करणारे आणि सभांमध्ये सहभागी होणार्यांची पक्षनिष्ठाही तपासली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरत आहे. एका बाजूला पक्षाचा झेंडा आणि दुसर्या बाजूला अपक्षांना पाठबळ, हा दुटप्पीपणा सहन केला जाऊ नये, अशी भावना व्यक्त होत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड उत्तरसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असून तो जनतेच्या विकासासाठी वापरला गेला, असे सांगितले जात आहे. मागील दोन दशकांत विकासनिधीचा खरा उपयोग काय असतो, हे मतदारसंघाला माहिती नव्हते; मात्र आमदार कल्याणकर निवडून आल्यानंतर जनतेला सक्रिय लोकप्रतिनिधी म्हणजे काय, हे कळाले, असे समर्थकांचे मत आहे. सतत मतदारसंघात फिरून जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारे, सुखदुःखात सहभागी होणारे नेतृत्व बदनाम करण्यासाठी काही जण कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करीत आहेत, असा आरोप होत आहे. पक्ष नेतृत्वाच्या बैठकींना गैरहजर राहून बाहेरून आरोपांची राळ उठवणार्यांची दखल श्रीकांत शिंदे यांनी घेतल्याची चर्चा असून, आता लवकरच दूध का दूध, पाणी का पाणी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हदगावच्या आमदारांचे नांदेड उत्तर क्षेत्रात काय काम?
हदगाव विधानसभेचे शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी महानगरपालिका निवडणुकीमध्ये विनाकारण ढवळाढवळ करून अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला एवढेच नाही तर त्यांनी हदगाव, हिमायतनगर येथून खास शिवसैनिकांची टीम पाठवून शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार यंत्रणा राबविली. खरे पाहिले तर शिवसेना नेतृत्वाने त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करायला हवी होती. कारण हदगाव विधानसभेचा व नांदेड उत्तर मतदार संघाचा अर्थार्थी संबंध नाही. केवळ पाहुणेरावळे सांभाळण्यासाठी व आमदार कल्याणकर यांच्या वेगाने चाललेल्या विकासाच्या रथाला अडथळा आणण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली होती.

COMMENTS