शेवगाव : तालुक्यातील जोहरापूर येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४ लाख ४८ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला मारल्य

शेवगाव : तालुक्यातील जोहरापूर येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४ लाख ४८ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला मारल्याची घटना शनिवारी (दि. ७) रात्री घडली असून रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी केसराबाई तुकाराम देवढे (वय ५५, रा. जोहरापूर, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसराबाई देवढे या कुटुंबीयांसह नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. दि. ६ जून रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजल्यापासून ते दि. ७ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याचे लॉकेट, नेकलेस, मंगळसूत्र, अंगठ्या, कानातील दागिने तसेच रोख रकमेचा समावेश असून, चोरीचा एकूण ऐवज सुमारे ४ लाख ४८ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील संशयित हालचालींची माहिती घेत तपास सुरू करण्यात आला आहे. बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रशांत नाकाडे हे करत आहेत.

COMMENTS