बीड : शिवसेना (शिंदे गट) खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी कथितरित्या अश्लाघ्य भाषेत संवाद साधत शिवीगाळ व धमकी दिल्याच्या प्रकाराचा ऑल इंड

बीड : शिवसेना (शिंदे गट) खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी कथितरित्या अश्लाघ्य भाषेत संवाद साधत शिवीगाळ व धमकी दिल्याच्या प्रकाराचा ऑल इंडिया पँथर सेनेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या प्रकरणी खासदारांनी सार्वजनिक माफी मागितली असली तरी केवळ माफी पुरेशी नसून पोलिस प्रशासनाने तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजातील प्रश्न मांडण्याचे आणि जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार करतात. अशा पत्रकारांना धमकावणे, अपमानास्पद भाषा वापरणे किंवा त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हा लोकशाही मूल्यांवर आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आघात आहे. नितीन सोनवणे यांनी या घटनेबाबत कठोर भूमिका घेत संबंधितांवर अपमानास्पद भाषा वापरणे, धमकी देणे व इतर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी शासन आणि पोलिस प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे. पत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की, पत्रकारांवर हात उचलण्याचा किंवा त्यांना धमकावण्याचा प्रयत्न कुणीही केला तर पँथर स्टाईल उत्तर दिले जाईल. शिवसेनेला पँथर चळवळीचा इतिहास चांगलाच माहिती आहे. हे भुरटे ऑपरेशन आहे, टायगर नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रकातून पत्रकारांवरील कथित गैरवर्तनाचा निषेध करत लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नितीन सोनवणे यांनी स्पष्ट केले की, पत्रकारांच्या अधिकारांचे संरक्षण करणे ही लोकशाहीची जबाबदारी असून अशा प्रकारच्या घटनांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास संघटनेच्या माध्यमातून राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

COMMENTS