Homeताज्या बातम्या

बीडमध्ये 11 ऑगस्टला ‘तुकाराम’ पुस्तकाचे लोकार्पण

सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या जीवनप्रवासावर आधारित पुस्तक; संजय आवटे प्रमुख वक्ते बीड । सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या जीवनप्रवासावर

नामांकित हमदर्द कंपनीकडून औषधींची बेदर्द भाव वाढपन्नास टक्क्यांनी वाढलेल्या भावामुळे रुग्णांचे कंबरडे मोडणार
महिला सक्षमीकरणासाठी ‘तुलसी क्रिएशन’चा उपक्रम प्रेरणादायी – महापौर वंदनाताई मगरे
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित मारहाणीच्या निषेधार्थ अंबाजोगाई बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या जीवनप्रवासावर आधारित पुस्तक; संजय आवटे प्रमुख वक्ते

बीड । सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या जीवनप्रवासावर आधारित ज्येष्ठ पत्रकार व लेखक शफी पठाण लिखित ’तुकाराम’ या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा मंगळवार, दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 वाजता बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. बिंदुसरा सांस्कृतिक सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या पुढाकारातून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव धांडे यांनी दिली.

या सोहळ्यात दैनिक लोकमत, पुणेचे संपादक, प्रसिद्ध लेखक व वक्ते संजय आवटे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मनोहर चासकर, कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड हे राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्याधिकारी जिल्हा परिषद जतिन रहमान, माजी सनदी अधिकारी अशोकराव मुंडे तसेच पुस्तकाचे लेखक शफी पठाण यांचा समावेश आहे. ’तुकाराम’ या पुस्तकातून तुकाराम मुंडे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील विविध टप्पे, संघर्षमय वाटचाल, निर्णयक्षम नेतृत्व आणि लोकाभिमुख प्रशासनाचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन बिंदुसरा सांस्कृतिक सामाजिक प्रतिष्ठान, बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव धांडे, कार्याध्यक्ष प्रमोद मंत्री, उपाध्यक्ष सुनील माने, डॉ. बळीराम गवते आणि सचिव प्राचार्य दिनकर तेलप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. आयोजन समितीमध्ये बप्पासाहेब तळेकर, भाई बाळासाहेब घुमरे, इंजि.गोविंद कदम, अ‍ॅड. योगेश शिंदे, प्रा. चाँद पटेल, सुहास सर्वज्ञ , अ‍ॅड. सुरेश वडमारे, अ‍ॅड. सादेक शेख, आनंद सारडा, सुरेश माने आणि पत्रकार रवी उबाळे, अ‍ॅड. जयंत राख हे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. साहित्य, प्रशासन, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी या लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बीडच्या मातीतून घडलेला कर्तृत्ववान प्रशासक

बीड जिल्ह्यातील मातीत जन्मलेले तुकाराम मुंडे यांनी आपल्या प्रामाणिक, पारदर्शक आणि जनहितैषी प्रशासनामुळे राज्यभर स्वतंत्र ओळख निर्माण केली. विविध महापालिका आणि शासकीय विभागांमध्ये काम करताना त्यांनी शिस्त, भ्रष्टाचाराविरोधातील ठाम भूमिका आणि लोककेंद्रित निर्णयांमुळे विशेष ठसा उमटवला. त्यांच्या प्रशासकीय प्रवासावर आधारित ’तुकाराम’ या पुस्तकाचे लोकार्पण आता त्यांच्या जन्मभूमी असलेल्या बीडमध्ये होत आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. बीडच्या भूमीतून घडलेल्या एका कर्तृत्ववान अधिकार्‍याचा प्रेरणादायी प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येणार आहे.

COMMENTS