बीड : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी-शर्ती रद्द करून सर्व शेतकर्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच शेतकर्यांचा

बीड : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी-शर्ती रद्द करून सर्व शेतकर्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गुरुवारी (दि. 11) बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. बीड, आंबेजोगाई, परळीसह जिल्ह्यातील अनेक भागांत निदर्शने करून शासनाच्या कर्जमाफी परिपत्रकाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली.
किसान सभेच्या पदाधिकार्यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर टीका करताना, योजनेतील कठोर अटींमुळे 70 टक्क्यांहून अधिक शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप केला. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार सर्व शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली. याशिवाय, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना दिलासा म्हणून प्रति हेक्टर 17 हजार 500 रुपयांचा पीक विमा देण्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करावे, देवस्थानच्या जमिनी त्या कसणार्या शेतकर्यांच्या नावे कराव्यात तसेच डीबीटी अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकर्यांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशा विविध मागण्याही आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. या आंदोलनात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. अजय बुरांडे, जिल्हा सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. पी. एस. घाडगे, कॉ. अरुण मते, कॉ. पांडुरंग राठोड, कॉ. भगवान बडे, कॉ. विष्णू देशमुख, व्यंकट ढाकणे, कॉ. किरण सावजी, कॉ. पप्पू देशमुख, खुर्शीद भाई, कॉ. विनायक राजमाने, राक्षेसवाडीचे सरपंच आबा कांबळे, कॉ. अशोक नागरगोजे, कॉ. शेख इस्माईल, कॉ. शंभुलिंग स्वामी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

COMMENTS