संगमनेर : निरोगी आणि सुदृढ समाजनिर्मितीसाठी कार्यरत असलेल्या ‘जयहिंद लोकचळवळ’च्या माध्यमातून अमृतवाहिनी मॉडेल स्कूल येथे आयोजित करण्यात आलेले पाच

संगमनेर : निरोगी आणि सुदृढ समाजनिर्मितीसाठी कार्यरत असलेल्या ‘जयहिंद लोकचळवळ’च्या माध्यमातून अमृतवाहिनी मॉडेल स्कूल येथे आयोजित करण्यात आलेले पाचदिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरातून विज्ञाननिष्ठ विचारांची सुदृढ पिढी घडेल, असा विश्वास संस्थेचे संस्थापक तथा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला.अमृतवाहिनी मॉडेल स्कूल येथे आयोजित शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात ११ ते १६ वयोगटातील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. यावेळी डॉ. तांबे म्हणाले, देश विकसित करायचा असेल तर युवकांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. समाजातील आर्थिक विषमता कमी झाली तरच देश खऱ्या अर्थाने प्रगत होईल. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठ विचारसरणी, सामाजिक जाणीव आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.शिबिरात विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात योगा, एरोबिक्स आणि व्यायामाचे प्रकार घेण्यात आले, तर सायंकाळी मैदानी खेळ, पथनाट्य, नाटक, अभिनय, नृत्य, गीतगायन आणि झांज अशा सांस्कृतिक उपक्रमांनी विद्यार्थ्यांना आनंददायी अनुभव दिला.समारोपप्रसंगी डॉ. सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अनुभव जाणून घेतले. विद्यार्थ्यांनी पुढील शिबिराचा कालावधी वाढविण्याची मागणी केली. यावेळी डॉ. तांबे यांनी सुट्टीच्या काळात पुन्हा शिबिर आयोजित करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पालक, विद्यार्थी तसेच जयहिंद लोकचळवळीचे राजेंद्र जोरावर आणि विलास दिघे उपस्थित होते.

COMMENTS