कर्जत : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून मोबाईलच्या अतिरेकी वापरापासून त्यांना पुस्तकांकडे वळविण्याच्या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेच्

कर्जत : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून मोबाईलच्या अतिरेकी वापरापासून त्यांना पुस्तकांकडे वळविण्याच्या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात ‘वाचन संकल्प रयतेचा’ या वर्षभर चालणाऱ्या वाचन चळवळीचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. झेप फाउंडेशन, मुंबई, ग्रंथालय विभाग आणि वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते झाले.
या अभिनव उपक्रमांतर्गत विद्यार्थी दररोज छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध राष्ट्रीय आणि जागतिक महापुरुषांची चरित्रे व प्रेरणादायी पुस्तके वाचणार आहेत. वाचनानंतर विद्यार्थ्यांना तीन प्रश्न विचारले जाणार असून योग्य उत्तरे देणाऱ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे.
उपक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी ‘कुमारांचे कर्मवीर’ या पुस्तकातील पहिल्या पाठाचे वाचन करून केली. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाचनाचे महत्त्व, पुस्तकांमधून घडणारे व्यक्तिमत्त्व आणि आजीवन वाचनाची सवय जोपासण्याची गरज यावर मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील समृद्ध वाचन परंपरेला अधिक बळकटी देण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी झेप फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. रेखा चौधरी यांनी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक प्रा. स्वप्नील म्हस्के यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

COMMENTS