भांडण मिटवण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका निष्पाप तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना केज तालुक्या

भांडण मिटवण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका निष्पाप तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यात घडली आहे. या घटनेत टाकळी येथील विलास नवनाथ घुले (वय 27) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे टाकळी गावासह संपूर्ण केज तालुक्यात संतापाची तीव्र लाट उसळली असून आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी केज शहरात रस्ता रोको आंदोलन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (दि. 20 जून) रोजी रात्री केज रस्त्यावरील एका हॉटेलसमोर काही व्यक्तींमध्ये वादावादी होऊन हाणामारी सुरू होती. त्यावेळी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून विलास घुले हा वाद मिटवण्यासाठी पुढे सरसावला. मात्र, भांडण थांबवण्याचा प्रयत्न करणार्या विलासलाच संबंधित टोळक्याने लक्ष्य केले. आरोपींनी त्याला बेदम मारहाण केल्यानंतर धारदार शस्त्राने पोटासह शरीराच्या विविध भागांवर सपासप वार केले. या हल्ल्यात विलास गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, शरीरावर झालेल्या गंभीर जखमा आणि अतिरक्तस्रावामुळे रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विलासच्या मृत्यूची बातमी समजताच टाकळी गावासह परिसरात शोककळा पसरली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने केज शहरात एकत्र जमले. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन छेडले. जोपर्यंत या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. या आंदोलनामुळे काही काळ केज शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केज पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून संशयित आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या घटनेमुळे केज तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून निष्पाप तरुणाच्या हत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS