नवी दिल्ली : भारताची जागतिक अर्थव्यवस्थेतील घोडदौड कायम असली तरी ताज्या अंदाजानुसार देश एक स्थानाने घसरून सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आंतरराष

नवी दिल्ली : भारताची जागतिक अर्थव्यवस्थेतील घोडदौड कायम असली तरी ताज्या अंदाजानुसार देश एक स्थानाने घसरून सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नव्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून पाचव्या स्थानावर असलेला भारत आता पुन्हा सहाव्या क्रमांकावर गेला असून ब्रिटनने त्याला मागे टाकले आहे.
सध्याच्या किमतीनुसार भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन 2025 मध्ये सुमारे 3.92 ट्रिलियन डॉलर्स तर 2026 मध्ये 4.15 ट्रिलियन डॉलर्स इतके राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याच कालावधीत ब्रिटनची अर्थव्यवस्था अधिक वेगाने वाढून 4.26 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक क्रमवारीत अमेरिका आणि चीन अनुक्रमे पहिल्या दोन स्थानांवर कायम आहेत. त्यानंतर जर्मनी, जपान, ब्रिटन आणि भारत अशी सहा प्रमुख अर्थव्यवस्थांची मांडणी दिसते.
घसरणीमागील प्रमुख कारणांमध्ये प्रामुख्याने सकल देशांतर्गत उत्पादन मोजण्यासाठी वापरले जाणारे आधार वर्ष 2011-12 वरून 2022-23 करण्यात आले. नव्या पद्धतीनुसार गणनेत काही प्रमाणात घट दिसून आली असून अर्थव्यवस्थेच्या आकारावर त्याचा परिणाम झाला आहे. दुसरे प्रमुख कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी झाल्याने डॉलरमध्ये मोजली जाणारी अर्थव्यवस्थेची एकूण किंमत घटली आहे. याउलट ब्रिटनच्या चलनाने बळकट स्थिती राखल्याने त्यांच्या अर्थव्यवस्थेचे मूल्य अधिक दिसून येते. तज्ज्ञांच्या मते ही घसरण तात्पुरती असू शकते. वाढीचा वेग कायम राहिल्यास भारत पुढील काही वर्षांत पुन्हा क्रमवारीत वर चढेल. अंदाजानुसार 2027 पर्यंत भारत जपान आणि ब्रिटनला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे एका देशात एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची एकूण आर्थिक किंमत. यामध्ये उद्योगांमध्ये तयार होणारा माल, शेतीमाल, विविध सेवा, व्यापार आणि सरकारी प्रकल्पांचा समावेश होतो.

COMMENTS