https://www.youtube.com/watch?v=6jT6wANVtzE तुमच्या खिशातील कागदी नोटा आता लवकरच इतिहास जमा होण्याची शक्यता आहे. कारण, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणज
तुमच्या खिशातील कागदी नोटा आता लवकरच इतिहास जमा होण्याची शक्यता आहे. कारण, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय आता देशात चक्क प्लास्टिकच्या, म्हणजेच ‘पॉलिमर’ नोटा आणण्याच्या तयारीत आहे. नुकतीच मुंबई आणि पाटणा येथे केंद्रीय बँकेच्या बोर्डाची एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये या विषयावर अत्यंत गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. लवकरच याचा एक पायलट प्रकल्प देशात सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या देशात डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असला, तरी रोख नोटांची मागणी कमी झालेली नाही. १५ मे पर्यंत चलनातील एकूण नोटा तब्बल ११.५ टक्क्यांनी वाढून ४२.८६ लाख कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. पण या कागदी नोटा लवकर खराब होतात, मळतात, फाटतात आणि या नोटांमुळे आजार पसरण्याचाही धोका असतो. म्हणूनच या सर्व समस्यांवर पर्याय म्हणून प्लास्टिक नोटांचा विचार केला जात आहे.
आरबीआयच्या नुकत्याच समोर आलेल्या आर्थिक वर्ष २०२५ च्या वार्षिक अहवालात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या एका वर्षात कागदी नोटा छापण्यासाठी सरकारला तब्बल ६,३७२ कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे. त्याआधीच्या वर्षात हा खर्च ५,१०१ कोटी रुपये होता. म्हणजेच छपाईचा खर्च सातत्याने वाढत आहे.

COMMENTS