अबू धाबी : अबू धाबी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिरात दौर्यात भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात ऊर्जा, संरक्षण, गुंतवणूक

अबू धाबी : अबू धाबी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिरात दौर्यात भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात ऊर्जा, संरक्षण, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण करारांवर शिक्कामोर्तब झाले. या दौर्यात एलपीती पुरवठ्याचा करार करण्याचा महत्वपूर्ण करार करण्यात आला. या दौर्यादरम्यान 7 महत्त्वाच्या विषयांवर सहमती झाली आहे. दोन्ही देशांमध्ये सामरिक संरक्षण भागीदारीच्या चौकटीवर करार करण्यात आला. ऊर्जा क्षेत्रात रणनीतिक पेट्रोलियम साठा तसेच द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एलपीजी) पुरवठ्याशी संबंधित करारांवर सहमती झाली. गुजरातमधील वाडिनार येथे शिप रिपेअर क्लस्टर उभारण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या. याशिवाय भारतीय पायाभूत सुविधा क्षेत्र, आरबीएल बँक आणि सन्मान कॅपिटलमध्ये 5 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली.
होर्मुझची सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित राहावी, अशी भारताची इच्छा असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. पश्चिम आशियातील युद्धाचा परिणाम जगभर जाणवत असून, भारताने नेहमीच संवाद आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचे समर्थन केले आहे, असे ते म्हणाले. संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अल्पावधीतच दोन्ही देशांनी विविध क्षेत्रांत वेगाने प्रगती साधली आहे. भविष्यातही दोन्ही राष्ट्रे परस्पर सहकार्य अधिक दृढ करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षित आणि खुली राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगावर होत असल्याने संवाद आणि राजनैतिक मार्गानेच तोडगा निघावा, अशी भारताची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीवरील हल्ल्यांचा कठोर शब्दांत निषेध केला. राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडता टिकवण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीने घेतलेल्या उपाययोजनांचे त्यांनी समर्थन केले. तसेच तेथील भारतीय नागरिकांची घेतलेली काळजीही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
संयुक्त अरब अमिरात माझे दुसरे घर
बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष अल नाहयान यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेख केला. संयुक्त अरब अमिरात हे माझे दुसरे घर आहे, असे म्हणत त्यांनी स्वागताबद्दल आभार व्यक्त केले. हवाई दलाच्या विशेष सन्मानामुळे भारतातील जनतेलाही अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. या दौर्यामुळे भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील आर्थिक, सामरिक आणि ऊर्जा क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS