मुंबई ते बंगळुरू हा प्रवास आता अधिक वेगवान आणि सोयीस्कर होण्याच्या दिशेने केंद्र सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन

मुंबई ते बंगळुरू हा प्रवास आता अधिक वेगवान आणि सोयीस्कर होण्याच्या दिशेने केंद्र सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात नव्या महामार्ग प्रकल्पाची घोषणा करताना मुंबई-बंगळुरू प्रवास भविष्यात अवघ्या साडेपाच तासांत पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या पाहणीनंतर त्यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती दिली.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संबंधित रस्ते प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातील आर्थिक आणि व्यापारी हालचालींना वेग मिळणार असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. या नव्या महामार्गाचा प्रारंभ मुंबईतील अटल सेतू परिसरापासून होणार असून, पुढे पुणे आणि फलटणमार्गे तो थेट बंगळुरूपर्यंत जोडला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार असून पहिल्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. गडकरी यांनी सांगितले की, आतापर्यंत उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणार्या वाहनांसाठी मुंबई-पुणे-कोल्हापूर किंवा सोलापूर हा मुख्य मार्ग होता. मात्र नव्या महामार्गामुळे वाहतूक सुरत, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, कर्नूल, चेन्नई, बंगळुरू, मंगळुरू आणि हैदराबादकडे अधिक वेगाने वळवता येणार आहे. यामुळे चेन्नई-दिल्ली अंतरात मोठी घट होईल, तर सोलापूर परिसरातील वाहतुकीवरील ताणही लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. याचबरोबर पुणे ते छत्रपती संभाजीनगर या नव्या मार्गालाही मंजुरी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. भविष्यात पुणे ते नागपूर हा प्रवास साडेचार तासांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई-बंगळुरू महामार्गाचा नवा आराखडा
मुंबईतील अटल सेतू परिसरापासून सुरू होणारा हा नवा महामार्ग पुणे आणि फलटणमार्गे थेट बंगळुरूपर्यंत जाणार आहे. पहिल्या टप्प्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, पुण्यापर्यंतचे बांधकाम तीन टप्प्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या महामार्गामुळे मुंबई ते बंगळुरू हा प्रवास भविष्यात अवघ्या साडेपाच तासांत पूर्ण होऊ शकतो.
चेन्नई-दिल्ली अंतरात मोठी घट
या नव्या मार्गामुळे चेन्नई ते दिल्ली या प्रवासाचे अंतर सुमारे 320 किलोमीटरने कमी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मालवाहतूक आणि कंटेनर वाहतुकीसाठी हा मार्ग विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
पुणे-छत्रपती संभाजीनगर मार्गालाही मंजुरी
पुणे ते छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या मार्गालाही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच भविष्यात पुणे ते नागपूर हा प्रवास अवघ्या साडेचार तासांत पूर्ण करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील अंतर कमी करून आर्थिक देवाणघेवाण आणि औद्योगिक विकासाला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील इतर महत्त्वाचे प्रकल्प
जेजुरी येथे उड्डाणपुलासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद
फलटण शहरातील रस्ते रुंदीकरणासाठी 97 कोटींची मंजुरी
नीरा मार्गावर 72 मीटर लांबीचा रेल्वे उड्डाणपूल उभारणी
टेंभुर्णी ते पंढरपूर दरम्यान साडेनऊ किलोमीटरचा बाह्यवळण
पंढरपूर शहराला पूर्ण रिंगरोड सुविधा

COMMENTS