Homeताज्या बातम्यादेश

अमेरिकेने मोडला युद्धविराम; इराणवर पुन्हा बॉम्बवर्षाव !

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटू लागले आहेत.

इराणने अणु कार्यक्रम पुन्हा सुरू केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल : ट्रम्प
फ्रान्सवर 200 टक्के आयातकर लादण्याचा ट्रम्प यांचा इशारा
मध्यपूर्वेत युद्धाची नांदी !


तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटू लागले आहेत. युद्धविरामाची चर्चा सुरू असतानाच अमेरिकेने पुन्हा इराणवर हवाई हल्ले केल्याचा आरोप तेहरानने केला असून, त्यामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे. या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत झाली असून, तेलपुरवठा, जागतिक व्यापार आणि हजारो खलाशांचे जीवन संकटात आले आहे.
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने ओमानच्या आखातात इराणी तेलवाहू जहाजांना लक्ष्य केले. खातम अल-अंबिया मुख्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, जास्क परिसरातून होर्मुझ सामुद्रधुनीकडे जाणार्‍या एका तेलवाहू जहाजावर कारवाई करण्यात आली. इराणने या घटनेला युद्धविरामाचे उल्लंघन ठरवत तीव्र निषेध नोंदवला आहे. इराणने स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, कोणत्याही हल्ल्याला कठोर आणि थेट प्रत्युत्तर दिले जाईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आक्रमक भूमिका घेत इराणला थेट इशारा दिला. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इराणने अमेरिकन युद्धनौकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इराणी लहान नौका उद्ध्वस्त केल्या. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ दिले जाणार नाही. करार झाला नाही तर आणखी हल्ले करण्यात येतील, असेही त्यांनी म्हटले. भारतीय खलाशांनाही या संघर्षाचा मोठा फटका बसला आहे. इराणी बंदरात अडकलेल्या काही भारतीयांनी भीषण परिस्थितीचे वर्णन केले आहे. एका भारतीय खलाशाने सांगितले की, गेल्या अनेक आठवड्यांपासून ते जहाजावरच अडकले असून, सतत युद्धाचे वातावरण, क्षेपणास्त्रांचे आवाज आणि भीती यामुळे मानसिक ताण वाढला आहे. काहींना वेतनही मिळालेले नाही. अनेक जहाजांवर अन्न व पाण्याचा साठा कमी होत असल्याने चिंता वाढली आहे.
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात तात्पुरत्या युद्धविरामासाठी हालचाली सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. सुमारे 30 दिवस युद्ध थांबवण्याचा आणि होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. या काळात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू ठेवण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, दोन्ही बाजूंनी सुरू असलेले हल्ले पाहता या चर्चांवर अनिश्‍चिततेचे सावट कायम आहे. या संघर्षात इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील तणावही वाढला आहे. इस्त्रायलने बेरूतमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या महत्त्वाच्या कमांडरांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. त्यानंतर हिजबुल्लाहने दक्षिण लेबनॉनमधील इस्त्रायली रणगाडे आणि लष्करी तळांवर हल्ले केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक व्यापक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीत अडकली 1500 जहाजे
या संघर्षाचा सर्वात मोठा परिणाम होर्मुझ सामुद्रधुनीवर झाला आहे. जगातील मोठ्या प्रमाणावर तेलवाहतूक या मार्गातून होते. संयुक्त राष्ट्रांच्या सागरी संस्थेच्या माहितीनुसार, सुमारे 1500 जहाजे या परिसरात अडकली आहेत. जवळपास 20 हजार खलाशी जहाजांवरच अडकून पडले असून, त्यांच्यासमोर अन्न, पाणी आणि सुरक्षेचे गंभीर प्रश्‍न निर्माण झाले आहेत. अनेक जहाजांना पुढे जाण्याची किंवा मागे फिरण्याची परवानगी मिळत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे.

COMMENTS