नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक आर्थिक परिस्थिती अस्थिर होत असताना केंद्र सरकारने सोने आणि चांदीच्या आयातीवर मोठा कर वाढ

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक आर्थिक परिस्थिती अस्थिर होत असताना केंद्र सरकारने सोने आणि चांदीच्या आयातीवर मोठा कर वाढीचा निर्णय घेतला आहे. रुपयावरील दबाव कमी करणे, आयात खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि वाढती व्यापार तूट रोखणे या उद्देशाने सरकारने सोने-चांदीवरील प्रभावी आयात कर थेट 15 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. नव्या दरांची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली असून वित्त मंत्रालयाने यासंदर्भातील अधिसूचना मंगळवारी उशिरा प्रसिद्ध केली.
सरकारच्या निर्णयानुसार, सोने आणि चांदीच्या आयातीवर आता 10 टक्के मूलभूत सीमाशुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय 5 टक्के कृषी पायाभूत सुविधा व विकास उपकरही लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 6 टक्के असलेला प्रभावी आयात कर आता 15 टक्क्यांवर पोहोचला आहे. या निर्णयामुळे आगामी काळात देशांतर्गत बाजारात सोने-चांदीच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचना क्रमांक 16/2026 अंतर्गत मौल्यवान धातू आणि त्यापासून तयार वस्तूंवरील शुल्क संरचनेत बदल करण्यात आले आहेत. सोने आणि चांदीपासून तयार दागिने व इतर वस्तूंवर 5 टक्के शुल्क आकारले जाईल. प्लॅटिनमपासून तयार वस्तूंवर 5.4 टक्के शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तसेच मौल्यवान धातूंनी तयार केलेल्या वापरलेल्या उत्प्रेरकांवर 4.35 टक्के शुल्क आकारले जाणार असून त्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन बंधनकारक राहणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारात सोन्याच्या दरात झालेली प्रचंड वाढ ही आयात मूल्य वाढण्यामागील प्रमुख कारण आहे. 2025-26 मध्ये सोन्याची सरासरी किंमत प्रति किलो जवळपास 99 हजार 825 डॉलर इतकी झाली. यापूर्वी 2024-25 मध्ये ही किंमत सुमारे 76 हजार 617 डॉलर होती. म्हणजेच एका वर्षात सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. सरकारच्या निर्णयाचा परिणाम देशांतर्गत बाजारात तातडीने दिसून आला. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे 1 हजार 500 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर 1 लाख 56 हजार 800 रुपयांवर पोहोचला. चांदीच्या दरातही मोठी उसळी दिसून आली. प्रति किलो 12 हजार रुपयांनी वाढ होत चांदीचा दर 2 लाख 77 हजार रुपयांवर गेला. व्यापार्यांच्या मते, आयात शुल्क वाढल्यामुळे पुढील काही दिवसांत दागिन्यांच्या बाजारात ग्राहकांची खरेदी मंदावण्याची शक्यता आहे. विवाह समारंभ आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या वाढत्या दराचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार असल्याचेही सांगितले जात आहे. देशांतर्गत बाजारात दरवाढ होत असताना आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण नोंदवली गेली. सोन्याचा दर प्रति औंस 42.33 डॉलरने घसरून 4 हजार 692.64 डॉलरवर आला. चांदीच्या दरातही 3.04 टक्क्यांची घट झाली असून ती 83.49 डॉलर प्रति औंस इतकी राहिली.
आर्थिक वर्षात 71.98 अब्ज डॉलरचे सोने आयात
2025-26 या आर्थिक वर्षात भारताची सोन्याची आयात मूल्याच्या दृष्टीने विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, भारताने तब्बल 71.98 अब्ज डॉलर मूल्याचे सोने आयात केले असून मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ 24 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे, मूल्य वाढले असले तरी प्रत्यक्ष आयातीचे प्रमाण मात्र कमी झाले आहे. 2025-26 मध्ये सोन्याची आयात 721.03 टनांवर आली असून त्यात 4.76 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.

COMMENTS