Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

’सोने खरेदी टाळा’च्या आवाहनाने सराफा बाजारात चिंतेचे ढग; हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पुढील वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे जे आवाहन केले आहे, त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रातील सराफा बाजारात

मिटकरींचे आरोपीच्या अटकेसाठी आंदोलन
विविध समाजाच्या वतीने आयोजित सामाजिक सलोख्याची समतेची मिसळ
सागरी व्यापार क्षेत्राचा समग्र विकास आवश्यक : राज्यपाल राधाकृष्णन



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पुढील वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे जे आवाहन केले आहे, त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रातील सराफा बाजारात उमटत आहेत. नांदेडसह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात असणार्‍या सराफा व्यवसायावरच नव्हे, तर या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या हजारो कारागिरांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
नांदेडमध्ये व्यवसायावर संक्रांत नांदेड शहरात 300 पेक्षा जास्त सराफा दुकाने असून वजीराबाद, श्रीनगर, वर्कशॉप आणि जुन्या नांदेड भागात हा व्यवसाय विखुरलेला आहे. येथील सराफा असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, सोने-चांदीचे दर आधीच वाढलेले असताना आता खरेदी थांबवण्याचे आवाहन केल्याने दुकानांचे भाडे, कर्मचार्‍यांचे वेतन आणि देखभाल खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न उभा राहिला आहे.  लग्न असो वा महत्त्वाचा समारंभ, नागरिकांनी येत्या वर्षभर सोने खरेदी करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना केले. युद्धजन्य स्थितीमुळे सोन्याचे दर आधीच गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सराफा बाजारपेठेतील व्यवहार रोडावले आहेत. त्यात पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनामुळे सराफा व्यवसायावर ऐन लग्नसराई व अधिक मास कालावधीत संक्रांत ओढवण्याची चिन्हे आहेत. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या जुन्या नांदेड भागात दोनशेपेक्षा अधिक सराफा व्यावसायिकांची प्रतिष्ठाने आहेत. तसेच, वजिराबाद, श्रीनगर, वर्कशॉप भागांसह आयटीआय परिसरात नामांकित कंपन्यांचे शोरूम्स आहेत. केवळ नांदेड शहरात 300 पेक्षा जास्त सराफा दुकाने असून, त्यांच्यावर आधारित कर्मचारी, कारागीर व मदतनीस अशा शेकडो कुटुंबांची रोजीरोटी सोने-खरेदी विक्रीतून होणार्‍या व्यवहारावर अवलंबून आहे. आजघडीला नांदेड शहरात सोने-चांदीचे दागिने घडवणारे 2 हजारांवर बंगाली कारागीर, तर पारंपारिक पद्धतीने दागिने घडविणारे 1 हजार सुवर्णकार व त्यांचे मदतनीस सराफा बाजाराच्या माध्यमातून रोजगार करतात. सोने विक्री व नियंत्रण आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरत असल्याने सराफा बाजारातील उलाढालीची रक्कम थेट विदेशी गंगाजळीत जमा होत असल्याचे असे आवाहन करत असल्याचा खुलासा पंतप्रधानांनी केला आहे. मात्र, हा व्यवसाय देशात पारंपरिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात केला जात असून, सोने खरेदी कमी अथवा बंद झाल्यास सराफा व्यावसायिकांसह त्यांच्यावर विसंबून असलेले हजारो कर्मचारी व कारागीर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणे अवघड बनेल. एकवेळ मोठ्या शोरूम्स चालकांचे कसेतरी भागले, परंतु लहान व्यावसायिक या निर्णयाने रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला जनता कशा प्रकारे पाहते व त्याचा बाजारपेठेवर काय परिणाम होतो, याकडे सराफा व्यावसायिक लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य सराफ महामंडळासह राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संघटना या निर्णयाविरोधात काय भूमिका घेतात, यावर सराफा बाजाराची पुढील घोडदौड अवलंबून राहणार आहे. तूर्त ग्राहक व व्यावसायिक ’वेट अँड वॉच’ भूमिकेत आहेत. सोने-चांदीचे दर सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे आधीच सराफा व्यवसाय संकटात आला आहे. अशावेळी सराफा व्यवसायाला उभारी देण्याऐवजी सोने खरेदी करू नका, असे आवाहन केले जात आहे. खरेदी करू नका ऐवजी खरेदीचे प्रमाण कमी ठेवा, असे म्हटले असते तर काही का होईना व्यवसाय चालला असता. मात्र, खरेदी ठप्प झाल्यास दुकानाचे भाडे, कर्मचारी वेतन, देखभाल आदी खर्चासाठी पैसे कुठून येणार?  नांदेडमध्ये पारंपरिक पद्धतीने दागिने घडविणारे सुमारे 1 हजार सुवर्णकार आणि 2 हजार बंगाली कारागीर असून, त्यांचे कुटुंब पूर्णपणे याच व्यवसायावर अवलंबून आहेत.  या उद्योगावर अवलंबून असणार्‍या कारागिरांनी आम्ही जगायचे कसे? असा आर्त सवाल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनामुळे एकूण उलाढालीत 15 ते 20 टक्क्यांची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जरी सामान्य ग्राहक लग्नसराईसाठी थोडीफार खरेदी करतील अशी आशा असली, तरी मोठ्या गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्यास बाजाराचे कंबरडे मोडेल, असे मत सुवर्ण व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
रोजगारावर मोठे संकट
’जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल’च्या (ॠगउ) मते, दागिने उद्योग हा केवळ सोने विक्रीपूरता मर्यादित नसून, त्याभोवती रत्नांची शुद्धीकरण प्रक्रिया, पॅकेजिंग, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक आणि मार्केटिंग अशा अनेक उप-उद्योगांची मोठी साखळी आहे. या क्षेत्रातील मंदीमुळे केवळ कारागीरच नव्हे, तर सेल्समनपासून ते सुरक्षा रक्षकांपर्यंत सर्वांच्या रोजगारावर गदा येणार आहे. एकूणच, आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाच्या परिस्थितीमुळे सोन्याचे दर वधारलेले असताना, देशांतर्गत स्तरावर खरेदी बंद झाल्यास सराफा बाजारपेठ पूर्णपणे कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या तरी राज्यातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये ’वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली जात आहे.
काही झाले तरी दरावर परिणाम नाही
सोने-चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात ठरत असतात. सोने खरेदी बंद करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून त्याचा परिणाम देशातील सराफा व्यवसायावर झाला तरी सोन्याचे दर आहे तेच राहतील. युद्धजन्य स्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याचे दर वाढले आहेत. युद्ध थांबले तरच या दरामध्ये स्थिरता येणे शक्य होईल, असा सराफा बाजारातून स्पष्ट केले.

COMMENTS