लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाळेश्वर-जैतापूर मार्ग सध्या अवजड वाहनांच्या बेफाम वाहतुकीमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. जालना समृद्धी महामार्गा

लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाळेश्वर-जैतापूर मार्ग सध्या अवजड वाहनांच्या बेफाम वाहतुकीमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. जालना समृद्धी महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली मुरुम वाहतूक आणि त्यात भर म्हणून वाढलेली अवैध वाळू वाहतूक यामुळे या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली असून, नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. गेल्या महिनाभरात या मार्गावर झालेल्या विविध अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लागणारा मुरुम नांदेड-नाळेश्वर-जैतापूर मार्गावरून दिवस-रात्र वाहून नेला जात आहे. दररोज तब्बल 200 ते 250 हायवा आणि टिप्पर वाहनांची सततची वर्दळ सुरू असल्याने रस्त्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. या वाहनांपैकी अनेक वाहने क्षमतेपेक्षा अधिक माल भरून धावत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. त्यातच वाळू माफियांनीही या मार्गाचा वापर सुरू केल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अवजड वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याची खडी निघून गेली असून, वाहनचालकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वार आणि शेतकरी वर्गाला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. रात्रीच्या वेळी धुळीचे साम्राज्य, भरधाव वेग आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढत असल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, प्रशासनाने वेळेत नियंत्रणात्मक उपाययोजना न केल्यामुळे ही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अनेकपटीने अधिक अवजड वाहतूक होत असतानाही ना पोलीस विभागाकडून कठोर कारवाई होत आहे, ना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. परिणामी, सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नाळेश्वर, जैतापूर, सोमेश्वर, ढोकी, पिंपरण, बोरगाव आदी गावांतील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. समृद्धी महामार्गाचे काम विकासासाठी महत्त्वाचे असले तरी त्यासाठी गावकर्यांच्या जीवाशी खेळ होऊ नये, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. मुरुम वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच अवजड वाहनांच्या वेळा निश्चित कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. स्थानिकांनी जिल्हा प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, येत्या पंधरा दिवसांत रस्त्याची दुरुस्ती, वाहतुकीवर नियंत्रण आणि अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन व उपोषण छेडले जाईल. या वाढत्या असंतोषामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
रस्त्यावर मृत्यूची सावली
दररोज 200 ते 250 हायवा-टिप्परची वाहतूक, समृद्धी महामार्गासाठी मुरुम वाहतुकीचा मोठा ताण, वाळू माफियांची अवैध वाहतूकही वाढली, महिनाभरात 3 जणांचा मृत्यू, अनेक जखमी, रस्त्यावर गुडघाभर खड्डे; दुचाकीस्वार त्रस्त, 15 दिवसांत उपाय न झाल्यास उपोषणाचा इशारा.

COMMENTS