Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कौटुंबिक कलहातून पतीचा काटा काढला; आठ महिन्यांपूर्वीचा खून गेवराई पोलिसांकडून उघड

गेवराई : पतीकडून होणार्‍या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीने स्वतःची बहीण आणि मेहुण्याच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर

रक्ताच्या नात्याला काळिमा; नराधम बाप, मामा आणि भावाकडून ५ वर्षांपासून चिमुकलीवर अत्याचार!
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
महिलेच्या धाडसाने चोरीचा प्रयत्न फसला; चोर रंगेहाथ ताब्यात; जामखेडमधील घटना

गेवराई : पतीकडून होणार्‍या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीने स्वतःची बहीण आणि मेहुण्याच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा खून आठ महिन्यांपूर्वी झाला असून आरोपींनी मृतदेह आणि दुचाकी पुलावरून गोदावरी नदीत फेकून दिली होती. गेवराई पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत पत्नीसह तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.  
पुणे येथील रहिवासी उद्धव तुकाराम शिंदे (वय 50) आणि त्यांची पत्नी संगीता शिंदे हे 3 सप्टेंबर 2025 रोजी गेवराई तालुक्यातील पांढरवाडी फाटा येथील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. उद्धव शिंदे हे पत्नीला नेहमी त्रास देऊन मारहाण करत असत. 6 सप्टेंबर रोजी पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेल्याने संगीता शिंदे हिने आपली बहीण सविता विष्णू वाजे आणि मेहुणा विष्णू कोंडीबा वाजे यांच्या मदतीने उद्धव यांचा गळा आवळून खून केला.   खून केल्यानंतर आरोपींनी दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृतदेह जवळच्या उसाच्या शेतात लपवून ठेवला. दोन-तीन दिवसांनी मृतदेहाचा वास येऊ लागल्याने, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोणीत भरून शहागड येथील जुन्या पुलावरून गोदावरी नदीत फेकून दिला. त्यानंतर दोन दिवसांनी मृतकाची मोटारसायकलही नदीपात्रात टाकून दिली. आपले बिंग फुटू नये म्हणून मुख्य आरोपी संगीता शिंदे हिने पुणे येथील सिंहगड पोलीस ठाण्यात पती हरवल्याची (मिसिंग) तक्रारही दाखल केली होती.   मयत उद्धव शिंदे यांचा मुलगा शुभम याला आपल्या वडिलांच्या बाबतीत काहीतरी अघटीत घडल्याचा संशय होता. तो 2 मे 2026 रोजी पुणे पोलिसांच्या एका अंमलदारासह गेवराई पोलीस ठाण्यात दाखल झाला. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तात्काळ पांढरवाडी येथून विष्णू वाजे आणि सविता वाजे यांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.   या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत संगीता शिंदे, विष्णू वाजे आणि सविता वाजे यांना अटक केली आहे. नदीपात्रातून मोटारसायकलचा सांगाडा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांढरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलिसांनी केली. सपोनि दीपक लंके या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

COMMENTS