जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सातत्याने कार्य करणारे समाजसेवक गौतम

जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सातत्याने कार्य करणारे समाजसेवक गौतम कांबळे यांना प्रतिष्ठेच्या पद्मपाणि पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय समाजकार्यास मिळालेला हा सन्मान असल्याने जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गौतम कांबळे यांनी अनेक वर्षांपासून समाजातील गरजू, वंचित आणि अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. समाज कल्याण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये कामानिमित्त येणार्या ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असतात. प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले. लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागापासून शहरातील झोपडपट्ट्यांपर्यंत अन्नधान्य, किराणा साहित्य आणि अत्यावश्यक वस्तू पोहोचवून अनेक कुटुंबांना दिलासा देण्याचे काम त्यांनी केले. संकटाच्या काळात त्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची भावना आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. सामाजिक कार्यासोबतच सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. युवकांना सामाजिक कार्यासाठी प्रेरित करणे, समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कासाठी आवाज उठवणे आणि विविध लोकहिताच्या चळवळींमध्ये सहभाग घेणे हे कार्य ते सातत्याने करत आहेत. त्यांच्या या प्रेरणादायी व उल्लेखनीय कार्याची दखल घेत पद्मपाणि संस्थेकडून दिनांक 17 मे 2026 रोजी बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पद्मपाणि पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या समाजसेवेची पावती मानला जात असून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसाठी तो प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही त्यांच्या हातून समाजोपयोगी कार्य असेच सुरू राहावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

COMMENTS