Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात उष्णतेचा कहर; अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी

अकोला : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असताना विदर्भातील अकोला येथे उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रखर

अकोला शासकीय रुग्णालयात प्रशासनाचा बेजबाबदारपणा! स्ट्रेचर न मिळाल्याने आदिवासी महिलेवर पतीला पाठीवर वाहण्याची आली वेळ; व्हिडिओ व्हायरल!। लोकमंथन News२४
उन्हाळी गर्दी कमी करण्यासाठी नांदेड-आसनसोल दरम्यान विशेष गाडी
‘शरीर सुखासाठी मुलगी पाठव, 10 हजार देतो’ ; पोलिस अधिकाऱ्याची कोठडीतील महिलेकडे मागणी
Heat Stroke: महाराष्ट्र होरपळला, राज्यात उष्माघाताचा पहिला बळी? अकोल्यात  तरुणाचा मृत्यू | महाराष्ट्र बातम्या - News18 Marathi

अकोला : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असताना विदर्भातील अकोला येथे उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रखर उन्हामुळे एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या घटनेमुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट कायम असून नागरिकांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विदर्भात तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. अकोल्यात सलग तिसर्‍या दिवशी तापमानाचा पारा चढतच राहिला असून, मंगळवारी तब्बल 44 अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली. त्यामुळे दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. याच उष्णतेच्या पार्श्‍वभूमीवर दिवसभर उन्हात रिक्षा चालवणार्‍या चालकाची प्रकृती अचानक खालावली. उष्माघातामुळे त्याला तीव्र त्रास जाणवू लागला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने उष्णतेच्या भीषणतेची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. जागतिक हवामान नोंदी करणार्‍या एका संकेतस्थळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अकोला आणि कर्नाटकातील कलबुर्गी ही शहरे मंगळवारी जगातील सर्वाधिक उष्ण ठिकाणांमध्ये अग्रस्थानी राहिली. या दोन्ही शहरांमध्ये 44 अंश सेल्सिअस इतक्या उच्च तापमानाची नोंद झाली. तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि शरीराला थंड ठेवण्याच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. अकोल्यातील तापमानात झपाट्याने वाढ होत असून केवळ पाच दिवसांतच पारा सुमारे 5 अंशांनी चढला आहे. 38.7 अंशांवर असलेले तापमान वाढत जाऊन 44 अंशांपर्यंत पोहोचले आहे. येत्या काही दिवसांतही आकाश निरभ्र आणि हवामान कोरडे राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून 20 एप्रिलपर्यंत उष्णतेची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने अमरावती व अकोला येथे 16 ते 19 एप्रिलदरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. बुलडाणा, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही पुढील काही दिवस उष्णतेचा प्रकोप वाढणार असल्याचे संकेत आहेत. तापमानाचा पारा 45 अंशांच्या दिशेने झेपावण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकात उच्च दाबाचे क्षेत्र
तज्ज्ञांच्या मते, कर्नाटक आणि लगतच्या महाराष्ट्रात उच्च दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे हवा खाली दाबली जाऊन ती अधिक तापते. त्याचवेळी आकाश निरभ्र असल्याने सूर्यकिरणे थेट जमिनीवर पडतात आणि उष्णता वाढते. तसेच बाष्पयुक्त वार्‍यांचे प्रमाण घटल्याने वातावरण अधिक कोरडे झाले आहे, ज्यामुळे तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. एकूणच, विदर्भात सध्या उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत असून पुढील काही दिवस परिस्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे ठरत आहे.

COMMENTS