Homeताज्या बातम्या

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका

मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने

शेतकर्‍यांना दोन लाखांची कर्जमाफीअर्थसंकल्पात घोषणा ; योजनेला अहिल्यादेवींचे नाव
कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार ठाम; आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रकृती खालावली
सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील 60 एकर ऊस जळून खाक
भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी दुहेरी संकटात; रोगाचा प्रादुर्भाव  आणि पावसामुळे भात शेती खराब Pune Marathi News | Farmers in the western part  of Bhor taluka ...


मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरण्या उशिरा झाल्या. त्यानंतर जुलैच्या सुरुवातीला काही भागांत जोरदार पाऊस पडला; मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिके कोमेजण्याची भीती निर्माण झाली आहे. याच काळात अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे उगवण न झाल्याने हजारो शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले असून संतापाची लाट उसळली आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील राजुरा परिसरात सोयाबीन बियाण्यांच्या निकृष्ट दर्जाचा प्रकार उघडकीस आला आहे. विविध कंपन्यांच्या बियाण्यांची पेरणी करून दहा ते अकरा दिवस उलटूनही उगवण झाली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तक्रारीनंतर संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी शेताची पाहणी करण्यासाठी आले असता संतप्त शेतकर्‍यांनी त्यांना जाब विचारला. ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी येऊन शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. अकोला जिल्ह्यातही सोयाबीन बियाण्यांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. प्राथमिक प्रयोगशाळा तपासणीत काही बियाण्यांचा दर्जा निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दोन कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. अकोल्यासह धाराशिव, लातूर, जालना, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांतही सोयाबीनची उगवण न झाल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा पेरणी करण्याची वेळ अनेक शेतकर्‍यांवर आली असून त्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा आणि अकोट तालुक्यांत नीलगायींच्या वाढत्या वावरामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. नीलगायींचे कळप उगवलेली पिके उद्ध्वस्त करत असल्याने शेतकर्‍यांना रात्रभर शेतात पहारा द्यावा लागत आहे. या नुकसानीची दखल घेऊन पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे. मराठवाड्यातही पावसाअभावी परिस्थिती चिंताजनक बनली आहे. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या तुलनेत सुमारे 56 टक्के तूट आहे. परिणामी नद्या, नाले आणि ओढे कोरडे पडले असून धरणांमध्येही अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. पावसाच्या भरोशावर पेरणी केलेली पिके आता करपू लागल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. जुलैचा दुसरा आठवडा संपत आला तरी कयाधू नदीचे पात्र कोरडेच असल्याचे चित्र आहे. अनियमित पाऊस, निकृष्ट दर्जाची बियाणे आणि वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव या तिहेरी संकटामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक व मानसिक तणावाखाली आहेत. बाधित शेतकर्‍यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, निकृष्ट बियाणे विकणार्‍या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि शेती वाचविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी राज्यभरातून जोर धरत आहे.

COMMENTS