बुलडाणा : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई साहेब यांच्या ऐतिहासिक विवाह सोहळ्याला 370 वर्षे पूर्ण होत असल्याच्या नि

बुलडाणा : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई साहेब यांच्या ऐतिहासिक विवाह सोहळ्याला 370 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, करवंड येथे प्रथमच ’ऐतिहासिक करवंड महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या माध्यमातून इतिहासाला उजाळा मिळण्यासोबतच, किल्ले व बुरुजाचे संवर्धनासाठी आणि भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व करवंड महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ’ऐतिहासिक करवंड महोत्सवा’चे आयोजन चिखली तालुक्यातल करवंड येथे करण्यात आले होते. यावेळी विधान परिषद आमदार धिरज लिंगाडे, विधानसभा आमदार श्वेता महाले, संजय गायकवाड, सिद्धार्थ खरात, मनोज यदे, मुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक विद्याधर महाले, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, राजेंद्र पोळ, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, अनिकेत निंबाळकर आयोजन समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
15 एप्रिल 1657 रोजी झालेल्या या ऐतिहासिक विवाहाचे स्मरण म्हणून आयोजित या कार्यक्रमात बोलताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई यांचा विवाह सोहळा केवळ एक कौटुंबिक प्रसंग नसून स्वराज्याच्या उभारणीतील एक महत्त्वाचा दुवा आहे. या भूमीला ऐतिहासिक महत्त्व असून, येथील पडझड झालेल्या बुरुजांचे पुनरुज्जीवन करणे आणि राजवाड्याचे जतन करणे ही काळाची गरज आहे. करवंड येथील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून विशेष प्रकल्प मंजूर करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने महाराणी गुणवंताबाई यांचा भव्य पुतळा उभारणे, ऐतिहासिक राजवाड्याची डागडुजी करणे आणि पर्यटनाच्या दृष्टीने या परिसराचा विकास करणे, या कामांना प्राधान्य दिला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. हा महोत्सव आणि स्मारकाचे काम केवळ शासन किंवा प्रशासनाचे नसून, यामध्ये स्थानिक ग्रामस्थ आणि सर्व शिवप्रेमींचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय परवानग्या मिळवण्यासाठी ग्रामपंचायत व स्थानिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

COMMENTS