नवी दिल्ली : देशातील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या दरात सलग दुसर्या दिवशी मोठी घसरण नोंदविण्यात आली. दहा ग्रॅममागे जवळपास दोन हजार रुपयांची
नवी दिल्ली : देशातील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या दरात सलग दुसर्या दिवशी मोठी घसरण नोंदविण्यात आली. दहा ग्रॅममागे जवळपास दोन हजार रुपयांची घट झाल्याने ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष या बाजाराकडे वेधले गेले आहे. दुसरीकडे, चांदीच्या किमतीत वाढ झाल्याने मौल्यवान धातूंच्या बाजारात मिश्र चित्र दिसून आले आहे.
गुरूवारी चोवीस कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅममागे 1 लाख 44 हजार 550 रुपये इतका नोंदविला गेला. मागील दिवसाच्या तुलनेत यात 1 हजार 904 रुपयांची घट झाली आहे. अठरा कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 8 हजार 412 रुपये 50 पैसे प्रति दहा ग्रॅम इतका राहिला असून त्यात 1 हजार 428 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीचा परिणाम लहान खरेदीवरही दिसून आला आहे. चोवीस कॅरेट सोन्याचा एक ग्रॅम दर सुमारे 190 रुपयांनी स्वस्त झाला असून शंभर ग्रॅम खरेदीत जवळपास 19 हजार रुपयांची बचत होत आहे. सोन्याच्या उलट चांदीच्या बाजारात सकारात्मक वातावरण दिसून आले. कमी दरावर खरेदी वाढल्याने चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. प्रति किलो चांदीचा दर 1 हजार 400 ते 1 हजार 500 रुपयांनी वाढून 2 लाख 40 हजार 100 रुपये इतका झाला आहे.काही शहरांमध्ये स्थानिक कर व इतर शुल्कांमुळे चांदीचा दर 2 लाख 45 हजार रुपये प्रति किलो या पातळीपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. ग्रॅममागे चांदीचा भाव साधारणपणे 240 ते 245 रुपये दरम्यान आहे.
सोन्याच्या घसरणीमागील प्रमुख कारणे
सोन्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे अनेक ग्राहकांनी नवीन खरेदी थांबवून जुने दागिने विकण्यास प्राधान्य दिले आहे. पुढील काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन बाजारात जुन्या सोन्याचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. जागतिक पातळीवरील आर्थिक घडामोडींचाही सोन्याच्या दरावर परिणाम होत आहे. अमेरिकेत व्याजदर दीर्घकाळ उच्च पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित आणि निश्चित परतावा देणार्या साधनांकडे वळत आहेत. परिणामी, सोन्याची मागणी कमी होऊन त्याच्या किमती घसरत आहेत.

COMMENTS