पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.9 टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात काहीशी घसरण झाली आहे. मागील वर्षी राज्याचा निकाल 94.10 टक्के होता.
यंदाच्या निकालात कोकण विभागाने 97.62 टक्के निकालासह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वांत कमी म्हणजे 88.41 टक्के नोंदवला गेला. पुणे, मुंबई, नाशिक, लातूर, अमरावती, नागपूर, कोकण, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरातून 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची घोषणा केली. यावेळी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. निकालात यंदाही मुलींनी आघाडी कायम राखली आहे. मुलांचा उत्तीर्णतेचा टक्का 89.56 इतका राहिला, तर मुलींचा निकाल 94.96 टक्के लागला. बारावीनंतर दहावीच्या निकालातही घट झाल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी मंडळाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यासाठी 271 भरारी पथकांसह महिला विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती. जिल्हास्तरावरही स्वतंत्र तपास पथकांची व्यवस्था करण्यात आली होती. आठ विविध माध्यमांतून ही परीक्षा घेण्यात आली.
179 विद्यार्थ्यांचा शंभर टक्के गुणांचा मान
यंदाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी सर्व विषयांत पूर्ण गुण मिळवत विशेष कामगिरी केली. त्यामध्ये लातूर विभागातील 104 विद्यार्थ्यांचा समावेश असून, राज्यात सर्वाधिक पूर्ण गुण मिळविणारे विद्यार्थी याच विभागातील आहेत. निकालामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
विभागानुसार निकाल
कोकण: 97.62 टक्के
कोल्हापूर: 95.47 टक्के
मुंबई: 94.97 टक्के
पुणे: 94.24 टक्के
नाशिक: 90.53 टक्के
अमरावती: 90.50 टक्के
नागपूर: 89.07 टक्के
लातूर: 88.42 टक्के
छत्रपती संभाजीनगर: 88.41 टक्के

COMMENTS