नांदेड : नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांच्या सीमाभागात गुरुवारी मध्यरात्रीनंतर अवघ्या दोन तासांच्या कालावधीत भूकंपाचे सलग चार धक्के जाणवल्याने नागरि

नांदेड : नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांच्या सीमाभागात गुरुवारी मध्यरात्रीनंतर अवघ्या दोन तासांच्या कालावधीत भूकंपाचे सलग चार धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पहाटे 1.37 ते 3.23 या वेळेत विविध ठिकाणी 3.6 ते 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के नोंदविण्यात आले. या भूकंपाची माहिती एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पहिला आणि सर्वाधिक तीव्र धक्का पहाटे 1.37 वाजता सिर्ली-पांगरा शिंदे परिसरात 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा जाणवला. या धक्क्याचे केंद्र जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होते. त्यानंतर पहाटे 2.15 वाजता काकडधाबा परिसरात 3.6 रिश्टर स्केलचा दुसरा धक्का बसला. अवघ्या दोन मिनिटांनी म्हणजे 2.17 वाजता त्याच परिसरात 3.9 रिश्टर स्केलचा तिसरा धक्का नोंदविण्यात आला. त्यानंतर पहाटे 3.23 वाजता पुन्हा काकडधाबा परिसरात 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा चौथा धक्का जाणवला. सलग धक्क्यांमुळे अनेक नागरिक झोपेतून घाबरून उठले आणि सुरक्षिततेसाठी घराबाहेर धाव घेतली.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, कळमनुरी आणि वसमत तालुक्यांमध्ये गेल्या सहा वर्षांपासून अधूनमधून भूगर्भातून गूढ आवाज येणे आणि सौम्य भूकंपाचे धक्के जाणवण्याच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत या परिसरात 37 हून अधिक धक्क्यांची नोंद झाली असली, तरी अवघ्या दोन तासांत सलग चार धक्के बसण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार काही जुन्या घरांच्या भिंतींना किरकोळ तडे गेल्याची माहिती समोर आली असून, मोठ्या प्रमाणात जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेनंतर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी जावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भूगर्भशास्त्रज्ञांकडून या परिसरातील भूगर्भीय हालचालींचा अभ्यास सुरू असून पुढील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

COMMENTS