नांदेड : शहरातील चैतन्यनगर ते सांगवी रस्त्यालगतच्या उद्यान परिसरात कर्तव्य बजावणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रामाणिकपणाचा अनोखा आदर्श घ

नांदेड : शहरातील चैतन्यनगर ते सांगवी रस्त्यालगतच्या उद्यान परिसरात कर्तव्य बजावणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रामाणिकपणाचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. पार्किंग परिसरात सापडलेला सुमारे २० हजार रुपये किमतीचा मोबाईल शोधून तो त्याच्या मूळ मालकाला सुखरूप परत करत त्यांनी पोलीस दलाची मान उंचावली आहे.
चैतन्यनगर-सांगवी मार्गावरील हे उद्यान नागरिकांसाठी सकाळी व सायंकाळी फिरण्याचे लोकप्रिय ठिकाण बनले आहे. येथील गर्दी लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी होत होती. याची दखल घेत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी उद्यान परिसरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. यामध्ये महादेव पिंपळगाव येथील इंद्रजित कल्याणकर आणि तरोडा बुद्रुक येथील नागोराव सिंगरवाड यांचा समावेश आहे. हे दोघेही नियमितपणे या परिसरात गस्त घालत असतात.
मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उद्यानातील नागरिक बाहेर पडल्यानंतर, नेहमीप्रमाणे पाहणी करताना या दोन्ही पोलिसांना पार्किंग भागात एक ‘सॅमसंग’ कंपनीचा मोबाईल फोन आढळून आला. योग्य चौकशी केल्यानंतर हा मोबाईल ३३ केव्ही उमरी येथील यंत्रचालक लक्ष्मीकांत बालाजीराव गायकवाड यांचा असल्याचे समोर आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांचा मोबाईल सुरक्षितपणे त्यांच्याकडे सुपूर्द केला. या प्रामाणिक कृतीबद्दल आसना मॉर्निंग वॉक ग्रुपचे अध्यक्ष आनंद कल्याणकर यांच्या हस्ते दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS