भिवंडी: शहरातील भंडारी कंपाऊंड परिसरात सिगारेट ओढण्याच्या किरकोळ कारणावरून झाले भांडण थेट खुनात रूपांतरित झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
भिवंडी: शहरातील भंडारी कंपाऊंड परिसरात सिगारेट ओढण्याच्या किरकोळ कारणावरून झाले भांडण थेट खुनात रूपांतरित झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. “जो हुआ सो हुआ, अब मुझे झगड़ा आगे नहीं बढ़ाना है,” असे सांगून वाद मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर चॉपर आणि धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंकुश सुभाष आडे (वय २६) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, भोईवाडा पोलिसांनी साई निर्मल, उमेश सिंग, पवन जाधव, सनी राठोड आणि अनिकेत यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, नॅशनल हॉटेल परिसरात सिगारेट ओढण्याच्या कारणावरून भावेश परिहार याचा आरोपींसोबत वाद झाला होता. मात्र, त्यावेळी मित्रांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केले होते. त्याच वादाचा राग आरोपींनी मनात ठेवला होता. जेव्हा अंकुश आडे, त्यांचा भाचा दिपक राठोड, तसेच भावेश परिहार आणि भगवान झा हे भंडारी परिसरातील नॅशनल हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आले होते, त्यावेळी आरोपींनी भावेश परिहारला बोलावून पुन्हा वाद उकरून काढण्याचा प्रयत्न केला.
त्यावर भावेशने “आता मला वाद वाढवायचा नाही,” असे सांगून तेथून मागे फिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंकुश आडे यांनीही भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत “जो हुआ सो हुआ” म्हणत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. याचाच तीव्र राग आल्याने आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत हल्ला चढवला. आरोपी साई निर्मल आणि उमेश सिंग यांनी चॉपरने अंकुश आडे यांच्या छातीवर, खांद्यावर आणि कंबरेवर सपासप वार केले. तर पवन जाधव, सनी राठोड आणि अनिकेत यांनी धारदार वस्तूंनी दिपक राठोड व भावेश परिहार यांच्यावरही हल्ला करून त्यांना जखमी केले.
घटनेनंतर परिसरात एकच घबराट आणि गोंधळ उडाला. जखमींना तातडीने इंदिरा गांधी रुग्णालयात आणि त्यानंतर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंकुश आडे यांची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्यांना मुंबईला हलविण्याची तयारी सुरू असतानाच उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे भंडारी कंपाऊंड परिसरात मोठी खळबळ उडाली असून, भोईवाडा पोलीस फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

COMMENTS