मुंबई : सुट्ट्यांच्या हंगामात परदेश पर्यटनाला पर्यटकांची मोठी पसंती मिळते. मात्र, यंदा मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांत भारतातून परदेशात जाणा

मुंबई : सुट्ट्यांच्या हंगामात परदेश पर्यटनाला पर्यटकांची मोठी पसंती मिळते. मात्र, यंदा मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांत भारतातून परदेशात जाणाऱ्या प्रवासीसंख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. विविध देशांमधील युद्धजन्य परिस्थिती, हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि प्रवाशांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना यांचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर झाला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) आकडेवारीतून हा कल स्पष्ट झाला असून, पर्यटन व्यवसायिकांच्या मते मे महिन्यातही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
विमान उड्डाणांची आकडेवारी (मार्च-एप्रिल):
- मार्च २०२५ : भारतातून १८ हजार ५०२ आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे झाली होती. यंदा मार्चमध्ये हा आकडा ११ हजार २८४ वर आला.
- एप्रिल २०२५ : १८ हजार ३२३ आंतरराष्ट्रीय उड्डाणे झाली होती, जी यंदा एप्रिलमध्ये केवळ ११ हजार ५०८ इतकीच राहिली. म्हणजेच एप्रिल महिन्यात विमान उड्डाणांमध्ये सुमारे ३७ टक्क्यांची घट झाली आहे.
प्रवासी संख्येतही मोठी घसरण: विमान उड्डाणांसोबतच प्रवाशांच्या संख्येतही मोठी घसरण दिसून आली आहे. मार्च २०२५ मध्ये २९ लाखांहून अधिक प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता, यंदा मार्चमध्ये हा आकडा १८ लाख ४४ हजार ९७६ इतका राहिला. एप्रिल २०२५ मधील ३० लाखांच्या तुलनेत यंदा एप्रिलमध्ये केवळ १८ लाख २४ हजार ९३६ प्रवाशांनी परदेश प्रवास केला. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ११ लाख ८२ हजारांहून अधिक प्रवासी कमी झाले आहेत. यंदाच्या जानेवारीत ३३ लाखांहून अधिक आणि फेब्रुवारीत २८ लाखांहून अधिक प्रवाशांनी परदेश प्रवास केला होता. पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, परदेश पर्यटन ही गरज नसून आनंदाचा भाग असल्याने, अनेकांनी यंदाचा प्रवास पुढे ढकलला किंवा रद्द केला आहे.
देशांतर्गत प्रवासातही मर्यादित घट
आंतरराष्ट्रीय पर्यटनात घट झाल्याने हे प्रवासी देशांतर्गत पर्यटनाकडे वळतील, असा अंदाज होता. मात्र, देशांतर्गत हवाई वाहतुकीच्या आकडेवारीत त्याचे ठोस प्रतिबिंब दिसत नाही. देशांतर्गत प्रवासीसंख्येत दोन्ही महिन्यांत काहीशी घट झाली असली, तरी ती आंतरराष्ट्रीय वाहतुकीइतकी तीव्र नाही.
देशांतर्गत प्रवाशांची तुलना:
- गेल्या वर्षी (मार्च/एप्रिल) : अनुक्रमे १ कोटी ४५ लाख आणि १ कोटी ४३ लाख प्रवाशांनी देशांतर्गत हवाई प्रवास केला होता.
- यंदा (मार्च/एप्रिल) : यंदा मार्चमध्ये हा आकडा १ कोटी ४३ लाख, तर एप्रिलमध्ये १ कोटी ३८ लाख इतका राहिला आहे.

COMMENTS