Homeताज्या बातम्या

भाजीपाल्याच्या नावाखाली ‘पुष्पास्टाईल’ खैराची तस्करी; वसईत ७-८ किलोमीटर पाठलाग करून टेम्पो जप्त

पालघर: वसई-विरार परिसरात खैर तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, भाजीपाल्याची वाहतूक करत असल्याचे भासवून खैराच्या लाकडांची तस्करी करण्याचा

सिद्धेश्वर घाटावर दशक्रिया विधीसाठी काकस्पर्श; नागरिकांनी परंपरेवर विश्वास ठेवावा, काकस्पर्श समितीचे आवाहन
महिला भाविकाची हरवलेली पर्स प्रामाणिकपणे परत
श्रद्धेच्या तिजोरीवरचा दरोडा! अयोध्येतील राममंदिर दानपेटीतील गैरव्यवहारामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप
Top 20 Most Common Crimes in the United States - Husker Law

पालघर: वसई-विरार परिसरात खैर तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, भाजीपाल्याची वाहतूक करत असल्याचे भासवून खैराच्या लाकडांची तस्करी करण्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसईच्या भाताणे वनक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांनी सोमवारी पहाटे मेढे परिसरात ही कारवाई केली. सुमारे ७ ते ८ किलोमीटर पाठलाग करून अवैध खैर वृक्षांची वाहतूक करणारा टेम्पो जप्त करण्यात आला असून, अंधाराचा फायदा घेत चालक पसार झाला आहे. या चोरीच्या प्रकारामुळे पुन्हा एकदा ‘पुष्पा’ सिनेमाची आठवण झाली आहे.

वसई पूर्वेच्या मेढे परिसरातून खैर लाकडाची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची पक्की बातमी वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन अधिकाऱ्यांनी परिसरात तातडीने विशेष नाकाबंदी तैनात केली. पहाटेच्या सुमारास एक संशयित ‘टाटा इन्ट्रा’ टेम्पो (क्रमांक MH 47 AS 2460) येताना दिसला. वन कर्मचाऱ्यांनी इशारा करूनही चालकाने टेम्पो न थांबवता त्याचा वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने भरधाव वेगात पाठलाग करून टेम्पोला रोखले; मात्र चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

जप्त केलेल्या टेम्पोची झडती घेतली असता वर भाजीपाला आणि खाली बेकायदेशीररीत्या खैर लाकडाची वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत १.२८४ घनमीटर (एकूण ७७ ओंडके) खैर जातीचे लाकूड, ज्याची अंदाजे किंमत १४,८९२ रुपये आहे, तसेच टेम्पो असा मुद्देमाल वन विभागाने ताब्यात घेतला आहे.

दरम्यान, ही कारवाई डहाणूचे उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर आणि मांडवीचे उपविभागीय वनअधिकारी अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात भाताणेचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनिष महाले, वनपाल आर. एस. माळगावी, व्ही. जी. राख, एन. बी. खुळपे तसेच वनरक्षक एस. एस. पवार, एल. एल. हमरे, डी. एन. सावरा व वनमजूर चंदन खानिवडेकर यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली. पसार झालेल्या चालकाचा कसून शोध सुरू असून वन विभाग या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

COMMENTS