नांदेड: मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा, समकालीन विषयांची प्रभावी मांडणी आणि राज्यभरातील नामवंत रंगकर्मींचा सहभाग यांचा सुरेख संगम अनुभवण्याची संधी
नांदेड: मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा, समकालीन विषयांची प्रभावी मांडणी आणि राज्यभरातील नामवंत रंगकर्मींचा सहभाग यांचा सुरेख संगम अनुभवण्याची संधी आता नांदेडकरांना मिळणार आहे. संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात भव्य ’स्वप्नरंग नाट्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून, तीन दिवसांत तब्बल सात दर्जेदार नाट्यप्रयोगांची पर्वणी रसिकांसाठी खुली राहणार आहे.
या महोत्सवात मुंबई, पुणे, परभणी, लातूर आणि नांदेड येथील नामांकित नाट्यसंस्था, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार सहभागी होणार आहेत. मराठी नाटक, दीर्घांक, एकांकिका आणि एकल नाट्यप्रयोग अशा विविध रंगरूपांतून सामाजिक वास्तव, समकालीन प्रश्न आणि कलात्मक अभिव्यक्तीचे प्रभावी दर्शन रंगमंचावर घडणार आहे.
२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता ’अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस’ या नाटकाने महोत्सवाचे उद्घाटन होईल. ३ ऑगस्ट रोजी ’द्विगत’, ’लेबल’ आणि ’गर्भ’ हे तीन आशयघन नाट्यप्रयोग रंगणार आहेत. तर ४ ऑगस्ट रोजी ’फारच टोचलंय’, ’खूपसा डायरी’ आणि ’आनंद ओवरी’ या नाट्यप्रयोगांनी महोत्सवाची सांगता होईल.
राज्यातील रंगकर्मी, साहित्यप्रेमी आणि नाट्यरसिक यांच्यात संवादाचे नवे दालन खुले करणारा हा महोत्सव सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून, नाट्यप्रेमी, विद्यार्थी, साहित्यरसिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रंगोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन स्वप्नरंग सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ रंगकर्मी दिनेश कवडे यांनी केले आहे.

COMMENTS