नांदेड : स्वदेशी जागरण मंचच्या स्वावलंबी भारत अभियान अंतर्गत देवगिरी प्रांताचा प्रांत विचार वर्ग व कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न झाला
नांदेड : स्वदेशी जागरण मंचच्या स्वावलंबी भारत अभियान अंतर्गत देवगिरी प्रांताचा प्रांत विचार वर्ग व कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह धनंजय धामणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मध्य क्षेत्र व पश्चिम क्षेत्राचे संघटनमंत्री केशव दुबोलिया यांनी स्वदेशी, आत्मनिर्भरता आणि स्वावलंबी भारताच्या संकल्पनेवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी आर्थिक स्वातंत्र्य, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन आणि स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार ही काळाची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वदेशी जागरण मंचचे प्रांत सहसंयोजक गजानन जोशी होते. व्यासपीठावर डॉ. युवराज परदेशी, स्वावलंबी प्रांत समन्वयक मिलिंद पोहनेरकर, उद्योजक योगेश उदगिरे आणि संस्थाचालक सचिन इंगळे यांची उपस्थिती होती.
मान्यवरांनी कार्यकर्त्यांना स्वदेशी विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षण वर्गात स्वावलंबी भारत अभियानाची उद्दिष्टे, संघटन विस्तार आणि आगामी उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला विविध जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

COMMENTS