Homeताज्या बातम्या

किनवटमध्ये आशा भरतीत पुन्हा ‘लक्ष्मीदर्शना’चे सावट? डॉ.गायकवाड यांना सक्तीच्या रजेवर पाठवा; संपूर्ण तालुक्यात तीव्र असंतोष

किनवट : ग्रामीण आरोग्याचा कणा मानल्या जाणार्‍या ’आशा स्वयंसेविका’ भरतीच्या पवित्र प्रक्रियेला अतिषय गुप्तता पाळल्या जात असुन किनवट तालुक्यात पुन्

कुणबी प्रमाणापत्रांवरून मनोज जरांगे आक्रमक; जात वैधता प्रमाणपत्रे रद्द होत असल्याने सरकारवर हल्लाबोल
अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात गुरुपौर्णिमा उत्साहात; ज्येष्ठ विधीज्ञांचा विशेष सत्कार
शिक्षकाच्या आक्रोशाकडे पाठ फिरवणारा शिक्षण विभाग? सुनील मोरे यांच्या आत्महत्येने शिक्षण विभागात खळबळ

किनवट : ग्रामीण आरोग्याचा कणा मानल्या जाणार्‍या ’आशा स्वयंसेविका’ भरतीच्या पवित्र प्रक्रियेला अतिषय गुप्तता पाळल्या जात असुन किनवट तालुक्यात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आणि कथित ’लक्ष्मीदर्शना’च्या गर्द सावटाने वेढले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तालुक्यासाठी नुकत्याच मंजूर झालेल्या 48 नवीन व रिक्त 03 अशा एकूण 51 आशा स्वयंसेविकांच्या पदभरतीवरून आरोग्य प्रशासनाचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला असून, संपूर्ण तालुक्यात तीव्र असंतोषाचा ज्वालामुखी खदखदू लागला आहे.

आरोग्य यंत्रणा ही सामान्य, शोषित आणि ग्रामीण जनतेसाठी एक सुरक्षित ढाल मानली जाते. परंतु, किनवट तालुक्यातील आरोग्य प्रशासनाच्या कारभारावर भ्रष्टाचाराची दाट धुकट रेष उमटली आहे. यापूर्वी पार पडलेल्या भरती प्रक्रियेत झालेले कथित गैरव्यवहार, नियमबाह्य आर्थिक उलाढाली आणि अपात्र उमेदवारांना अभय देण्याचे प्रकार अजूनही जनतेच्या स्मरणातून पुसले गेलेले नाहीत. मागील भरतीतील भ्रष्टाचाराचे डाग अद्याप धुतले गेले नसताना, सध्या कार्यरत असलेले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड यांच्याच देखरेखीखाली ही 48 नविन व रिक्त 03 अशा 51 पदांची नवी भरती पार पाडण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे पारदर्शकतेचा पूर्णपणे बळी दिला जाईल आणि दिवसरात्र कष्ट करणार्‍या, पात्र ग्रामीण महिलांच्या हक्कांवर वरवंता फिरवला जाईल, असा थेट आणि गंभीर संशय स्थानिक नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. भरती प्रक्रियेतील गुप्तता व संशयास्पद वातावरण दूर सारून निष्पक्षता जपण्यासाठी स्थानिक जनभावनेतून खालील प्रमुख मागण्या प्रकर्षाने समोर येत असून कोणत्याही राजकीय अथवा प्रशासकीय दबावाला वाव राहू नये म्हणून विद्यमान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड यांची तात्काळ हाकलपट्टी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे किंवा या संपूर्ण प्रक्रियेतून पूर्णतः अलिप्त ठेवावे, पूर्वी पार पडलेल्या आशा भरतीतील कथित आर्थिक व्यवहारांची आणि प्रशासकीय अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अर्जांची छाननी, गुणतालिका तयार करणे आणि पात्र-अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे या सर्व संवेदनशील बाबी जिल्हा नव्हेतर विभाग स्तरीय वरिष्ठ अधिकार्‍यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या निगराणीखालीच पार पाडल्या जाव्यात. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार उमेदवारांकडून अर्जांची पळापळ सुरू झाली असली, तरी प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे ग्रामीण भागातील गरजू व अभ्यासू महिलांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे सावट पसरले आहे. स्थानिक सामाजिक संघटनांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली असून, मागील भ्रष्टाचाराची पुनरावृत्ती याही भरतीत झाली, तर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या दारात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा खणखणीत इशारा दिला आहे. आता नांदेड जिल्हा परिषद प्रशासन आणि वरिष्ठ आरोग्य संचालक या गंभीर प्रकरणाची वेळेत दखल घेऊन भ्रष्ट कारभारावर कारवाईचा बडगा उगारतात, की पुन्हा एकदा अन्यायावर पांघरूण घालतात, याकडे संपूर्ण किनवट तालुक्याचे डोळे लागले आहेत. मागील भरतीतील डाग अद्याप ताजे आहेत. अशा स्थितीत त्याच अधिकार्‍यांच्या हाती पुन्हा भरतीची सूत्रे सोपवणे म्हणजे बोकडाच्या मानगुटीवर सुरी ठेवण्यासारखाच प्रकार आहे.

COMMENTS