कोपरगाव: रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना,

कोपरगाव: रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आरोग्य विभाग आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताचा पाच दिवसीय योग उत्सव दि. २१ जून ते २५ जून या कालावधीत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला.
योग प्रशिक्षक मुक्ता शेजवळ व डॉ. अंकित कृष्णानी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात विविध योग प्रकार, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन यांसारख्या विविध योगासनांचा सराव करून घेण्यात आला. तसेच अनुलोम-विलोम, कपालभाती, भ्रामरी यांसारख्या प्राणायाम प्रकारांचे महत्त्व आणि त्यांचे आरोग्यदायी परिणाम समजावून सांगण्यात आले. ध्यानधारणेच्या सत्रामध्ये मनाची एकाग्रता, मानसिक शांतता, सकारात्मक विचारसरणी आणि तणावमुक्त जीवनासाठी ध्यानाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांच्या नियमित अभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि जीवनातील संतुलन साधण्यास मदत होते, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ऍड. संदीप वर्पे यांच्या प्रमुख उपस्थितीत या समारंभाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी योगाचे महत्त्व विशद करत आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या तणाव व विविध आजारांवर योग हा प्रभावी उपाय असल्याचे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी योग ही भारताची जगाला मिळालेली अमूल्य देणगी असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास अंगीकारण्याचे आवाहन केले. या पाच दिवसीय उत्सवात विद्यार्थ्यांना योगाचे शास्त्रीय व व्यावहारिक महत्त्व पटवून देण्यात आले.

COMMENTS